डिंगणे-बांबरवाडीत गव्यांचा धुमाकूळ; बागायतींचे मोठे नुकसान

डिंगणे-बांबरवाडीत गव्यांचा धुमाकूळ; बागायतींचे मोठे नुकसान

बांदा  

 

    डिंगणे – बांबरवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नुकतीच येथील शेतकरी सुनील धामापूरकर यांच्या बागेत गव्यांच्या कळपाने शिरून माड आणि फोफळीच्या झाडांची मोठी मोडतोड केली. रात्रीच्या वेळी आलेल्या या कळपाने नवीन लावलेल्या झाडांचेही नुकसान केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गव्यांच्या वाढत्या वावरामुळे आता शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाणेही कठीण झाले आहे. वनविभागाने या गव्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी आता या भागातून केली जात आहे.