कुडाळातील नमो उद्यान राज्यात सर्वोत्तमच ठरले पाहिजे - आमदार निलेश राणे
कुडाळ
येथील नगरपंचायतीच्या वतीने साकारल्या जाणाऱ्या 'नमो उद्याना'चा भूमिपूजन सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे उद्यान उभारले जात आहे. या कार्यक्रमात बोलताना राणे यांनी प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे चांगलेच कान टोचले. हे उद्यान महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे ठरले पाहिजे आणि त्या स्पर्धेतील ५ कोटी रुपयांचे पारितोषिक कुडाळला मिळालेच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. आमदार राणे म्हणाले की, या उद्यानासाठी शासनाने १ कोटी रुपयांचा निधी दिला आहे, मात्र कामाचा दर्जा असा ठेवा की राजस्तरावरील प्रथम क्रमांकाचे ५ कोटींचे बक्षीस आपल्यालाच मिळाले पाहिजे. त्यांनी स्पष्ट केले की, मच्छिंद्र कांबळी सभागृह, नगरपंचायत इमारत, नळपाणी योजना आणि रस्ते विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे, आता त्या कामांचा दर्जा राखण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. हे उद्यान शहराची संस्कृती दर्शवणारे असावे आणि त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या सूचनाही विचारात घ्याव्यात, असा सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमादरम्यान आमदार निलेश राणे यांनी नियोजनातील त्रुटींवरून नाराजी व्यक्त करत लोकप्रतिनिधींना सुनावले. व्यासपीठावरील खुर्थ्यांसाठी धडपडण्यापेक्षा लोकांच्या कामासाठी धडपड करा, असे सांगत त्यांनी आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मतभेद बाजूला सारून शहराच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. या प्रसंगी नमो उद्यानाच्या परवानग्या मिळवल्याबद्दल अभियंता श्रीमती हळदणकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
konkansamwad 
