कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल २६ तासांनंतर सुरू; मांडवी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना.

कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल २६ तासांनंतर सुरू; मांडवी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना.

रत्नागिरी.

  कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. तब्बल 26 तासांनतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरु झाली आहे. मांडवी एक्स्प्रेस मुंबईकडं रवाना झाली. गेल्या काही दिवसांपासून कोकणात जोरदार पाऊस सुरु आहे. कोकणातील मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे हाल सुरु आहेत. रविवारी 14 जुलै रोजी खेड-दिवाण खवटी दरम्यान रेल्वे रूळावर दरड कोसळली. यानंतर कोकण रेल्वे ठप्प झाली होती. अखेर 26 तासांच्या परिश्रमानंतर दरड हटवून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आलं आहे.
    खेडच्या दिवाणखवटी आणि विन्हेरे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळल्यानं संपूर्ण कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं होतं. रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे मांडवी एक्स्प्रेस खेड स्थानकात थांबवण्यात आली होती. जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली होती. प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. दरम्यान 26 तासांनंतर कोकण रेल्वेसेवा सुरळीत झाल्यानंतर प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं आहे. रेल्वे रुळावर दरड कोसळ्यामुळे कोकणातील रेल्वेसेवा ठप्प होती. रेल्वे रुळावरील दगड आणि मातील बाजूला काढण्यात आले. 3 जेसीबी आणि 50 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या मदतीनं रेल्वे रुळावरील दगड आणि माती बाजूला करण्यात आली. त्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून रेल्वे रुळाची पाहणी करण्यात आली. रेल्वे रुळाची पाहणी केल्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात आली.