आंदोलन संपल्यानंतर विक्रेते आणि औषध कंपन्यांचा समाचार घेणार - राजू शेट्टी
कणकवली
यंदा आंबा, काजू बागायतदारांनी कीटकनाशकाची फवारणी केली. मात्र ही कीटकनाशके बोगस असल्याने या फवारणीचा कोणताही उपयोग बागायतदारांना झाला नाही. उलट त्यासाठी प्रचंड खर्च करावा लागला. आता हेच विक्रेते कीटकनाशकाच्या वसुलीसाठी बागायतदारांना धमकावत आहेत. मात्र सध्याचे आंदोलन संपल्यानंतर कीटकनाशक विक्रेते आणि कंपन्या या दोहोंचा ही समाचार घेणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. शेट्टी म्हणाले, कीटकनाशकाची विक्री किंमत आणि खरेदी किंमत यामध्ये प्रचंड तफावत आहे. आजवर कीटकनाशक कंपन्या आणि विक्रेत्यांनी कीटकनाशकाची विक्री करून बक्कळ पैसा कमावला आहे. यंदा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्यामुळे थांबायला हवे होते. एक वर्षे नफा झाला नाही म्हणून त्यांचे फारसे काही बिघडत नाही. पण शेतकरी आधीच अडचणीत असताना हे विक्रेते बागायतदारांकडून कीटकनाशकाच्या वसुली साठी तगादा लावत आहेत. असा तगादा लावणाऱ्या विक्रेत्यांचे सामान बाहेर फेकून द्यावे या भूमिकेशी मी अजूनही ठाम आहे. शेट्टी म्हणाले, अनेक प्रकारची कीटकनाशके, औषधे यांच्या विक्रीसाठी बंदी आहे. तरीही ती सिंधुदुर्गात विकली जात आहे. या सर्व प्रकाराकडे कृषी विभाग डोळेझाक करत आहे. मात्र आंबा, काजू बागायतदारांचे आंदोलन संपल्यानंतर अशा बोगस आणि बंदी असलेल्या औषध विक्री करणाऱ्यांचा आम्ही पर्दाफाश करणार आहोत. तसेच बोगस कीटकनाशके तयार करून त्याची शेतकऱ्यांना विक्री करणाऱ्या कंपन्यांचाही आम्ही दणका देणार असल्याचा इशारा श्री. शेट्टी यांनी दिला.
konkansamwad 
