कुडाळ तालुक्यात पावसाचा धुमाकुळ......कर्ली नदीने इशारा पातळी ओलांडली

कुडाळ
कुडाळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. २४ तासात तब्बल १७५ मिमी पावसाची नोंद झाली. यात कर्ली नदीने इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे शहरातील आंबेडकरनगर वस्तीत पाणी शिरले. पुराच्या पाण्याने वेढलेल्या दहा कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तर कर्ली नदीकाठच्या बाव, बांबुळी, पावशी, सरंबळ या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान सगळीकडे पाणीच पाणी झाल्यामुळे अनेक ठिकाणी तालुक्यातील वाहतूक ठप्प झाली होती. गुलमोहर हॉटेलकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेल्याने एसटी वाहतूक राज हॉटेल मार्गे वळवण्यात आली होती. माणगाव खोऱ्यातील दुकानवाड सह इतर छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेल्याने त्या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. दिवसभर जिल्हाभरात पावसाचा जोर असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.