बॅ. खर्डेकर महाविद्यालयात भित्तिपत्रक सादरीकरण स्पर्धा उत्साहात
वेंगुर्ला
महिलांना सुरक्षित सन्मानपूर्वक आणि भयमुक्त कार्यस्थळ उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आलेला महत्त्वपूर्ण कायदा म्हणजेच posh act 2013 म्हणजेच लैंगिक छळ प्रतिबंध कायदा याचा समाजात, विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात श्रीमती सुशीलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फाउंडेशन कोल्हापूर, महिला विकास कक्ष आणि अंतर्गत निवारण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 'पॉश एक्ट 2013 लैंगिक छळ प्रतिबंध कायदा' या विषयावर भित्तिपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. धनराज गोस्वामी होते.
सदर स्पर्धेत वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील २४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या भितीपत्रक स्पर्धेमध्ये महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराची व अन्यायाला वाचा फोडणारी भित्तीपत्रक सादर केली होती. सदरील स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. धनराज गोस्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रो.डॉ. धनराज गोस्वामी म्हणाले की, विद्यार्थ्यांचा विकास घडवून आणावयाचा असेल तर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन शिक्षण घेणे खूप गरजेचे आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ कायद्याची माहिती मिळत नाही तर समानता, सन्मान, सुरक्षितता व जबाबदारी याची जाणीव निर्माण होते तसेच ते पुढे म्हणाले की,आपल्या देशात महिलांवरील गुन्ह्यांची वाढ नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आहेत. या कायद्याचा वापर समाजात होणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये महिलांप्रति सामाजिक नीतिमत्ता, नैतिकता, मूल्ये, आदर आणि सन्मान रुजवणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन केले. यावेळी महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. मनीषा मुजुमदार यांनी प्रास्ताविकेतून स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला.
या स्पर्धेचे परीक्षण वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. धनश्री पाटील व राज्यशास्त्र विभागाचे प्रा. राम चव्हाण यांनी केले. सदर स्पर्धेच्या निकालामध्ये वरिष्ठ महाविद्यालयातील कु. सुयश अणसुरकर यांना प्रथम क्रमांक, कु. ईशान चव्हाण यांना द्वितीय क्रमांक आणि कु. सानिका गावडे या विद्यार्थींना तृतीय क्रमांक मिळाला. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील कु. दीपक कांबळे यांना प्रथम क्रमांक, कु. सक्षम जाधव यांना द्वितीय क्रमांक आणि कु. कौमुदी बागायतदार या विद्यार्थींना तृतीय क्रमांक मिळाला आहे. सदरील कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव माननीय प्रा. जयकुमार देसाई, पेट्रॉन कॉन्सिल मेंबर मा. दौलतराव देसाई चेअरमन सौ. मंजिरी देसाई-मोरे, व सौ ऋतुजा पृथ्वी मोरे यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला संस्था प्रतिनिधी श्री. सुरेंद्र चव्हाण तसेच अंतर्भूत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. एस. एच. माने कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. दिलीप शितोळे व कनिष्ठ महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्या प्रा. सावंत मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शिवकन्या तोडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन युवती सचेतना मंचाच्या समन्वयक सौ शुभदा माने यांनी मानले.
konkansamwad 
