घरावर झाड पडून नुकसान झालेल्या वृद्ध महिलेला 'मनसे'चे आर्थिक सहकार्य

घरावर झाड पडून नुकसान झालेल्या वृद्ध महिलेला 'मनसे'चे आर्थिक सहकार्य

कुडाळ

 

       ऐन पावसाळ्यात घरावर झाड पडून नुकसान झालेल्या अणाव येथील वृद्ध महिला शांती अणावकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. राज ठाकरे यांनी आपल्या जन्मदिवसानिमित्त कोणतीही बॅनरबाजी किंवा इतर निरर्थक शुभेच्छांचे कार्यक्रम न करता, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. या आदेशाचे पालन करत कुडाळ तालुक्यातील अणाव येथे हा मदतीचा हात देण्यात आला. शांती अणावकर यांच्या घरावर झाड पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने या घराची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक होते. मनसेचे स्थानिक उप तालुकाध्यक्ष अवि अणावकर यांनी ही गंभीर बाब मनसे जिल्हाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने मदतीचा निर्णय घेण्यात आला. मनसेचे नेते शिरीष सावंत यांच्या हस्ते श्रीमती शांती अणावकर यांच्याकडे घराच्या दुरुस्तीसाठी ही आर्थिक मदत सुपुर्द करण्यात आली. याप्रसंगी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, प्रभारी तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, उप तालुकाध्यक्ष अवि अणावकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. मनसेच्या या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे अणावकर कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून, परिसरातून या सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत आहे.