कोल्हापूर येथील श्री क्षेत्र गगनगडावर गगनगड परिक्रमा चे भव्य आयोजन

कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील श्री क्षेत्र गगनगडावर, स्वामी गगनगिरी महाराज आश्रम गगनगड यांच्या वतीने "गगनगड परिक्रमा" या धार्मिक सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.या गगनगड परिक्रमेस रविवार दिनांक ९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता प्रारंभ होणार असून महाराजांचे चैतन्यदायी पादुकांवर विधीवत पूजा-अभिषेक झाल्यावर सदर पादुका समवेत गगनगड परिक्रमेस प्रारंभ होईल. सदर परिक्रमा गगनगडाच्या पायथ्यापासून निघून करूळ घाट मार्गे भुईबावडा येथील रिंगेवाडी येथे दुपारी विश्रांती साठी थांबेल, तिथे भोजनाची सोय करण्यात येणार असून नंतर परिक्रमा गगनगडच्या दिशेने रवाना होईल.गडाला प्रदक्षिणा घालून म्हसोबा देवस्थान मार्गे गडावर येईल.संपूर्ण परिक्रमेस ८ ते ९ तास लागणार असून अंदाजे २२ कि.मी. च्या वर अंतर असून रस्ता डोंगराळ भागातून जातो. संपूर्ण परिक्रमेमध्ये विविध भागातून भाविकजन व भजनी मंडळ सहभागी होणार आहेत.स्वामी गगनगिरी महाराज जेव्हा गडावर जात,त्यावेळेस जिथे विश्रांती साठी थांबत त्या रिंगेवाडी येथील गगनगिरी विश्रामधामात भोजन व्यवस्था ठेवण्यात आली आहे.गगनगड परिक्रमा आश्रमस्थानी आल्यावर महाआरती होणार असून त्यानतंर सर्वाना महाप्रसाद देण्यात येईल. सदर परिक्रमेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील महाराजांच्या विविध आश्रमातून सेवेकरी व भाविक भक्तमंडळी येत असून गगनगडावर गगनगिरी भक्तांचा कुंभमेळा भरल्याचे पहावयास मिळत आहे. या धार्मिक सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी ओणीआश्रम प्रमुख श्री.उल्हासगिरी महाराज, दाजीपूर (किटाचे रान )आश्रम प्रमुख श्री.आझादगिरी महाराज, बुरंबाळी (तुळशी तलाव) आश्रम प्रमुख श्री.सदानंदगिरी महाराज, झांजूचे पाणी आश्रम प्रमुख श्री.दीपक महाराज तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर येणार आहेत.स्वामी गगनगिरी महाराज आपल्या या गगनगड परिक्रमेचे महत्व व माहात्म्य जाणून होते. म्हणून ते आपल्या भक्तांना नेहमी म्हणत, ज्या कोणाला श्री नर्मदा नदी परिक्रमा, श्री कृष्णा नदी परिक्रमा अथवा श्री गिरनार परिक्रमा करणे शक्य होत नसेल त्यांनी ही पुण्यदायक अशी गगनगड परिक्रमा अवश्य करावी, महाराजांचे उपदेशानुसार व चैतन्यदायी अनुभूती मुळे दिवसेंदिवस भक्तांचा गगनगड परिक्रमेस भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. धार्मिक कार्यक्रम यथासांग पार पडण्यासाठी श्री क्षेत्र गगनगडावरील सेवेकरी मंडळी तसेच गगनगडाचे आजूबाजूकडील आश्रमांतील भक्तमंडळी व सेवेकरी सतत कार्यरत राहून मदत करत आहेत.सदर गगनगड परिक्रमा यशस्वी होण्यासाठी आश्रम प्रमुख संजयसिंह पाटणकर, रमेश माने व बापूसाहेब पाटणकर हे विशेष मेहनत घेत आहेत.