PM मोदी 5 फेब्रुवारीला महाकुंभमध्ये करणार शाहीस्नान.

PM मोदी 5 फेब्रुवारीला महाकुंभमध्ये करणार शाहीस्नान.


     महाकुंभला 13 जानेवारी 2025 पासून सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे गंगा, जमुना आणि सरस्वती नदीच्या संगमावर साधू, संत आणि भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. प्रयागराजमध्ये 144 वर्षांनी महाकुंभचा योग जुळून आल्याने या पवित्र संगमावर शाहीस्नान करण्यासाठी कोट्यवधी लोकांनी पहिल्या दोन आठवड्यांमध्ये हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. 
        पंतप्रधान नरेंद्र मोदीही हिंदू धर्मियांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी या ठिकाणी भेट देणार असल्याने जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी 5 फेब्रुवारी रोजी महाकुंभला हजेरी लावणार आहेत. मोदी या संगमावर शाहीस्नान करणार आहेत. मात्र पंतप्रधान मोदींनी महाकुंभमध्ये सहभागी होण्यासाठी 5 फेब्रुवारीचीच तारीख निवडण्यामागेही एक खास कारण आहे. 
       बसंत पंचमी आणि मौनी आमवस्येचा दिवस पवित्र मानला जातो. 5 फेब्रुवारीला हे दोन्ही योग एकाच दिवशी जुळून येत असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या दिवसाला माघ अष्टमी असं म्हणतात. हा दिवस तपश्चर्या, भक्ती आणि दान या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच पंतप्रधान मोदी 5 तारखेला पवित्र शाहीस्नान करणार आहेत. 
          पंचांगानुसार, माघ अष्टमी ही माघ महिन्यात गुप्त नवरात्रीच्या कालावधीमध्ये येते. या कालावधीमध्ये तपश्चर्या, दान आणि संगमावर स्थान करणं पवित्र मानलं जातं. या दिवशी तपश्चर्या केल्यास, दानधर्म केल्यास आणि संगमावर स्थान केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं. धार्मिक दृष्ट्‍याही माघ अष्टमीला विशेष महत्त्व आहे. आपला अध्यात्मिक स्तर वाढवण्यासाठी या दिवसाला अधिक महत्त्व दिलं जातं. या दिवशी धार्मिक कार्य केल्यास फार पुण्य लाभतं असं मानलं जातं.