गाडीवरचा ताबा सुटल्याने कार थेट गॅरेजमध्ये
कुडाळ
चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव इलेक्ट्रिक कार थेट गॅरेजमध्ये घुसल्याचा प्रकार झाराप येथे घडला. या अपघातात गॅरेज मध्ये उभ्या असलेल्या चार दुचाकींसह अपघातग्रस्त कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना मुंबई-गोवा महामार्गावर झाराप येथे घडली.अपघातात निरवडे येथील चालक वेदांत मल्हार (वय ३०) हा सुदैवाने बचावला आहे. चालत्या परिस्थितीत अचानक गाडीचा स्पीड वाढल्यामुळे हा अपघात घडला, असा दावा मल्हार यांनी केला आहे.
निरवडे येथील रहिवासी वेदांत याने अवघ्या महिनाभरापूर्वीच महिंद्रा कंपनीची इलेक्ट्रिक कार खरेदी केली होती. वेदांत हा ओरोस येथून आपल्या घरी परतत असताना झाराप परिसरात आला. यावेळी त्याचा गाडीवरून ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या गॅरेजमध्ये ही भरधाव कार जाऊन धडकली. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या चार ते पाच दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीच्या ब्रेकचा आणि धडकेचा मोठा आवाज महामार्गालगतच्या घरांपर्यंत पोहोचला. या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली.या जोरदार धडकेत कारच्या पुढच्या भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या करून ठेवलेल्या अनेक वाहनांना मागून जोराची धडक बसल्याने त्यातील काही गाड्या अक्षरशः रस्त्यावर फेकल्या गेल्या. धावत्या कारचा वेग अचानक वाढल्यामुळे हा अपघात झाला, असा दावा मल्हार यांनी केला आहे.
konkansamwad 
