राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सिंधुदुर्गवासियांसाठी महत्वाचा निर्णय!

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सिंधुदुर्गवासियांसाठी महत्वाचा निर्णय!

 


मुंबई

 

      तांत्रिक अडचणींमुळे बंद असलेल्या चिपी विमानतळाची सेवा पूर्ववत सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. मंत्रालय, मुंबई येथे पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाची सेवा काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे बंद आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करून हे विमानतळ VGF (व्हायबलीटी गॅप फंडिंग) अंतर्गत सुरू करण्यासाठी केंद्राची परवानगी घेतली. यानुसार झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चिपी विमानतळाची सेवा पूर्ववत करण्यास सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राणे म्हणाले की, चिपी विमानतळाची सेवा पूर्ववत झाल्यास कोकणातील, राज्यातील व राज्याबाहेरील पर्यटकांना याचा मोठा फायदा होईल. तसेच VGF मुळे चिपी विमानतळाची नाइट लँडिंगची समस्या देखील दूर होईल. यामुळे चिपी विमानतळाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल.'गणेशोत्सवापूर्वी ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही मंत्री राणेंनी सांगितले.हा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य मंत्रिमंडळाचे आभार ही त्यांनी व्यक्त केले.
       वेंगुर्ला गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील वर्षानुवर्षे असलेले अतिक्रमण नियमानुकुल करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. दरम्यान, कित्येक वर्षांचा हा प्रलंबित प्रश्न महायुती सरकारच्या कार्यकाळात मार्गी लागला असल्याची माहिती यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, वेंगुर्ला गवळीवाड्यासाठी माजी मंत्री, आमदार दिपक केसरकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न लावून धरला, त्यामुळे हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन तो मार्गी लागला आहे. त्यामुळे याचे संपूर्ण श्रेय हे आमदार केसरकर यांना जाते.' असे मंत्री नितेश राणे यावेळी म्हणाले.