नेरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार
कुडाळ
कुडाळ तालुक्यातील नेरूर येथे बिबट्याने हल्ला करून एका बैलाचा बळी घेतला आहे. या घटनेत स्थानिक शेतकरी मोहन लवू जोशी यांचा बैल जागीच ठार झाला. ऐन शेतीच्या हंगामात बैलाचा बळी गेल्याने जोशी कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.पेरणी तोंडावर असताना शेतीचा मुख्य आधारच गेल्याने जोशी यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. बिबट्याने थेट ठाकूरवाडीत येऊन हल्ला केल्याने संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे. आपली गुरे-वासरे कशी वाचवायची, या चिंतेत ग्रामस्थ आहेत.घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वनविभागाचे श्री पाटील यांनी शेतकरी मोहन जोशी यांना लवकरात लवकर शासकीय नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली. बिबट्याला त्वरित जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा आणि गस्त वाढवावी, अशी मागणी नेरूर ग्रामस्थ करत आहेत. जनावरांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन व उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही जोर धरत आहे. वनविभागाने वेळ न दवडता ठोस पावले उचलावीत, अशी तीव्र भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
konkansamwad 
