म्हापण दशक्रोशीतील सकल हिंदू समाजातर्फे १८ एप्रिलला ‘सकल हिंदू संमेलन’
परुळे
देव, देश आणि धर्म सर्वोपरी मानणारी आपली भारतीय संस्कृती अखिल विश्वात आदर्श आणि अनुकरणीय मानली जाते. पाट, परुळे, म्हापण दशक्रोशीतील सकल हिंदू समाजातर्फे शनिवार दि. १८ एप्रिल २०२६ रोजी ‘सकल हिंदू संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ३.३० ते ६.०० या वेळेत आदिशक्ती मंगल कार्यालय, पाट येथे हे संमेलन होणार आहे. केळूस, खवणे, मळई, कोचरा, म्हापण, निवती, पाट, परुळे, कुशेवाडा, भोगवे, चिपी या भागातील सर्व हिंदू बंधू-भगिनींनी या संमेलनात बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. हे संमेलन कोणा एका संस्थेने किंवा संप्रदायाने आयोजित केले नसून पाट, परुळे, म्हापण दशक्रोशीतील धार्मिक, अध्यात्मिक संप्रदाय आणि समस्त हिंदू बंधू-भगिनींनी एकत्र येऊन आयोजित केले आहे. याच्या नियोजनासाठी एक समिती तयार करण्यात आली असून या समितीत दशक्रोशीतील सदस्यांचा समावेश आहे. प्रातिनिधिक स्वरूपात नियोजन समिती स्थापन केली असली तरी सर्व हिंदू बांधव आणि भगिनींनी सर्वतोपरी हातभार लावून हे संमेलन यशस्वी करावे, असे आयोजकांनी कळवले आहे. या संमेलनाचा खर्च सुद्धा सर्व हिंदू बांधवांच्या योगदानातूनच होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यानंतर निमंत्रित मान्यवरांचे मार्गदर्शन असे या संमेलनाचे स्वरूप असणार आहे. तसेच या संमेलनामध्ये आपल्या भागामध्ये धर्म-संस्कृतीसाठी काम करणाऱ्या सर्व पंथ आणि संप्रदायाच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार आहे. धर्म आणि संस्कृतीचे महत्त्व, श्रेष्ठत्व काय आहे आणि आपण एकत्र का आले पाहिजे हे समजून घेण्यासाठीच या संमेलनाचे आयोजन केले असल्याचे सकल हिंदू समाज, पाट-परुळे-म्हापण दशक्रोशी यांच्यावतीने सांगण्यात आले. समस्त हिंदू बंधू-भगिनींनी एक दिवस धर्मकार्यासाठी म्हणून या संमेलनास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन निमंत्रकांनी केले आहे.
konkansamwad 
