‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिर.....नीट-यूजी, सीईटी, जेईई, सीएलएटी आदी प्रवेश परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी २३ व २४ सप्टेंबर रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिर.....नीट-यूजी, सीईटी, जेईई, सीएलएटी आदी प्रवेश परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी २३ व २४ सप्टेंबर रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. २२ 


      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य शासनाच्या वतीने दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्राबाबतच्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी दि. २३ व २४ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.नीट-यूजी, सीईटी, जेईई, सीएलएटी आदी व्यावसायिक प्रवेश परीक्षांमध्ये सहभागी झालेल्या आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांनी संबंधित त्रुटींची पूर्तता वेळेत करणे आवश्यक आहे.इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी https://ccvis.barti.in/ या संकेतस्थळावर CCVIS येथे ऑनलाइन अर्ज करावा. अर्जाची प्रत, आवश्यक मूळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती समिती कार्यालयात सादर कराव्यात. CCVIS प्रणालीवर विद्यार्थी, सेवा, निवडणूक व इतर कारणांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो.जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अर्जावर निर्णय घेऊन वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी साधारणतः पाच महिन्यांचा कालावधी घेते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेपूर्वी अर्जातील त्रुटींची पूर्तता करून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अन्य अर्जदारांनीही जात वैधता प्रमाणपत्राबाबत आवश्यक माहितीसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सिंधुदुर्ग कार्यालयाशी संपर्क साधावा व विद्यार्थ्यांनी या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य विशाल नाईक यांनी केले आहे.