सागरतीर्थ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाईची मागणी

सागरतीर्थ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाईची मागणी

वेंगुर्ला

 

        मौजे सागरतीर्थ येथील भूमापन क्र. २/३क मध्ये विभा विठ्ठल अडूळकर यांनी सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून केलेले अनधिकृत, बेकायदेशीर बांधकाम त्वरित काढून टाकणेबाबत राजेश प्रभाकर गोडकर रा. सागरतीर्थ-टाक, ता. वेंगुर्ला यांनी उपविभागीय अधिकारी सावंतवाडी व तहसीलदार वेंगुर्ला यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे मागणी केली होती.माहिती अधिकारातून प्राप्त माहितीनुसार, विलास डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्रा. लि. तर्फे प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता विकास प्रभाकर परब यांनी दि. २३/०२/२०२६ रोजी तक्रार अर्ज सादर केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने तहसीलदार, वेंगुर्ला यांनी दि. २६/०२/२०२६ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे मंडळ अधिकारी, शिरोडा यांनी जागेवर स्थानिक पंच, पोलीस पाटील, ग्राममहसूल अधिकारी यांचेमार्फत स्थळपाहणी करून दि. २७/०२/२०२६ रोजी अहवाल मा. तहसीलदार वेंगुर्ला यांना सादर केला.सदर अहवालात विभा विठ्ठल अडूळकर यांनी सर्व्हे नं. २/३क मध्ये महसूल, वनविभाग, खनिकर्म विभाग, तसेच अन्य सक्षम प्राधिकरणाकडून सदर जमीन मिळकतीत बांधकाम करण्याकरिता, त्यातील झाडे तोडण्याकरिता परवानगी घेतल्याबाबतची कोणतीही कागदपत्रे सादर केली नसल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले होते.त्याचप्रमाणे सर्व्हे नं. २/३क मध्ये उच्चतम भरती रेषेपासून ४० मीटर अंतरावर पक्की भिंत व सिमेंट पत्रे असलेली एक इमारत, उच्चतम भरती रेषेपासून १०० मीटर अंतरावर ३ आरसीसी इमारती, उच्चतम भरती रेषेपासून १०० मीटर अंतरावर पक्की व लोखंडी पत्रे असलेल्या दोन इमारती उभारलेल्या असून सदरची बांधकामे सीआरझेड टप्पा २ क्षेत्रात मोडत असून महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण अधिसूचना २००९, भारत सरकार यांचेकडील राजपत्रानुसार ० ते २०० मिटरच्या आतील क्षेत्र हे नाविकास क्षेत्रात येते असल्याचे नमूद केले. सबब सदरच्या सहाही इमारती ह्या बेकायदेशीर व अनधिकृत असून त्या काढून टाकणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे वाळू व गौण खनिज उत्खनन इत्यादी बाबींची तपासणी ही इटीएस द्वारे करून अवैध उत्खननाचा साठा निश्चित करून दंडात्मक कारवाई करणेबाबत सदर अहवालात नमूद केलेले.सदर अहवाल दि. २७/०२/२०२६ रोजी मा. तहसीलदार वेंगुर्ला यांस सादर केलेला असून, मा. तहसीलदार वेंगुर्ला यांनी सदरचा अहवाल त्यांचेकडील दि. ०६/०३/२०२६ रोजीचे पत्राने मा. उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी यांना कार्यवाहीसाठी सादर केलेला होता.मात्र सदर अहवालास तीन महिने उलटून देखील विभा विठ्ठल अडूळकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा त्यांची अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यात आलेली नाहीत. त्यामुळे विभा विठ्ठल अडूळकर यांनी आपली अनधिकृत बांधकामे चालूच ठेवलेली असून सध्या आर.सी.सी. कंपाऊंडचे काम चालू आहे. त्या बाबतचे १५ फोटोग्राफ्स सोबत जोडत असल्याचे गोडकर यांनी म्हटले आहे.तरी विभा विठ्ठल अडूळकर यांनी केलेली अनधिकृत बांधकामे येत्या पंधरा दिवसात काढून टाकून त्यांचे विरुद्ध सीआरझेड नियमांचा भंग करून बेकायदेशीर बांधकामे, वृक्षतोड व अनधिकृत वाळू व माती उत्खननाबाबत गुन्हा दाखल करून जास्तीत जास्त रॉयल्टी व दंड वसूल करण्यात यावा. सदर बाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती उलट टपाली पाठविणेत यावी.अन्यथा आपणाविरुद्ध व विभा विठ्ठल अडूळकर हिचेवर कारवाई करण्यास दिरंगाई करून त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना व अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन व संरक्षण देण्याच्या कृत्याविरुद्ध सक्षम न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा राजेश गोडकर यांनी दिला.