करूळ घाटात डिझेल व पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर पलटी
वैभववाडी
सांगलीहून कसालकडे डिझेल व पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर करूळ घाटात पलटी झाल्याची भीषण घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असून, टँकर एका धोकादायक वळणावर डोंगराकडील बाजूला उलटला. या अपघातात टँकर चालक सुदैवाने किरकोळ जखमी झाला असला तरी टँकरचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.संबंधित टँकरमध्ये ६ हजार लिटर पेट्रोल आणि ४ हजार लिटर डिझेल होते. टँकर पलटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन रस्त्यावरून वाहू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेमुळे करूळ घाटातील वाहतूक सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत पूर्णपणे ठप्प झाली होती.अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक संतोष राठोड, योगेश लाड, तसेच महसूल विभागाचे नायब तहसीलदार दिलीप पाटील, शिवाजी सुतार, अमोल पाटील, श्री. साठे, वैशाली साबळे, तलाठी कांबळे आणि श्री. नागावकर यांच्यासह पोलीस कर्मचारी शैलेंद्र कांबळे, मोहन राणे, हरेश जायभाय, संतोष माने, वैशाली कोलते व किरण मेथे घटनास्थळी तातडीने दाखल झाले. प्रशासकीय यंत्रणेसोबतच माजी उपसभापती भालचंद्र साठे आणि सह्याद्री जीवरक्षक टीमचे हेमंत पाटील, प्रकाश सावंत, सिद्धेश कोलते व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू ठेवले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने तातडीने उपाययोजना केल्या असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
konkansamwad 
