तुळसमध्ये २१ जूनला भव्य सकल हिंदू संमेलन, हिंदू एकता आणि संस्कृती संवर्धनाचा जागर

तुळसमध्ये २१ जूनला भव्य सकल हिंदू संमेलन, हिंदू एकता आणि संस्कृती संवर्धनाचा जागर

तुळस

 

   हिंदू समाजामध्ये एकात्मता, संघटन आणि धर्मजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाज यांच्या वतीने रविवार, 21 जून 2026 रोजी सायंकाळी 3.30 ते 6 या वेळेत उत्सव मंगल कार्यालय, तुळस येथे भव्य सकल हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे.तुळस, पाल, अणसुर, पेंडूर, मातोंड, होडावडे आणि वजराट या सात गावांतील हिंदू बांधवांच्या संयुक्त पुढाकारातून या संमेलनाचे आयोजन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराचे लक्ष या संमेलनाकडे लागले आहे.सनातन हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि आदर्श संस्कृती आहे. हजारो वर्षांच्या परंपरेतून मानवतेला अध्यात्म, सहिष्णुता, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रप्रेमाचे मूल्य देणाऱ्या या संस्कृतीला आजही समाज दिशा देत आहे. पाचशे वर्षांच्या प्रयत्नांनंतर अयोध्येतील श्रीराम मंदिराची पुनर्निर्मिती झाल्याने हिंदू समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे धर्म आणि संस्कृतीप्रती अभिमानाची भावना अधिक दृढ झाली आहे.सध्याच्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाने मतभेद विसरून एकत्र यावे, संघटित व्हावे आणि समाजहितासाठी कार्य करावे या भावनेतून हे संमेलन आयोजित केले आहे. युवकांमध्ये संस्कारांची जपणूक व्हावी, राष्ट्रभक्ती आणि सांस्कृतिक जाणीव दृढ व्हावी तसेच हिंदू समाजाच्या विविध प्रश्नांवर विचारमंथन व्हावे हा या मागचा उद्देश आहे.संमेलनासाठी ज्येष्ठ कीर्तनकार सुबोध मराठे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. गणेश गोविंद उर्फ राजू जोशी गुरुजी हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान, संस्कृतीचे महत्त्व आणि संघटित समाजाची आवश्यकता यावर मार्गदर्शन करणार आहेत. हिंदू जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक सत्यविजय नाईक हिंदू समाजासमोरील आव्हाने आणि धर्मजागृतीवर विचार मांडणार आहेत. अमित गोपाळ नाईक देखील उपस्थितांना संबोधित करणार आहेत.संमेलनाच्या तयारीसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सातही गावांमध्ये व्यापक जनसंपर्क मोहीम सुरू आहे. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.हिंदू समाजाची एकजूट, सामाजिक सलोखा, सांस्कृतिक अभिमान आणि राष्ट्रहिताची भावना बळकट करण्यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सहभागी होणाऱ्या सर्वांनी सहकुटुंब, मित्रपरिवारासह पारंपरिक मंगल वेशात उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.