वेंगुर्ले नगरपरिषद सर्वसाधारण सभेत खडाजंगी.....अपूर्ण कामांबाबत नगरसेवकांची नाराजी
वेंगुर्ले
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील अपूर्ण व निकृष्ट कामांवरून नगरसेवकांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. गटारांची कामे वेळेत पूर्ण न होणे आणि कामाचा दर्जा खालावल्याने नागरिकांच्या समस्या वाढल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.सभेच्या सुरुवातीला नगरसेवकांनी शहरातील गटारांची कामे अर्धवट राहिल्याचा मुद्दा उपस्थित केला. पावसाळ्यापूर्वी गटारांची कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. तसेच काही ठिकाणी जेसीबीने खोदकाम करून काम अर्धवट सोडल्याने पाणी तुंबण्याचा धोका वाढला आहे, असे नगरसेवकांनी सांगितले. कामाचा दर्जाही समाधानकारक नसल्याने निधीचा अपव्यय होत असल्याची टीका झाली.यावर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्षांनी पावसाळ्यापूर्वी सर्व प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. कामाचा दर्जा तपासूनच देयके अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या सोयीचा विचार करून कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.शहरातील इतर विकासकामांच्या प्रगतीचा आढावा देखील सभेत घेण्यात आला. प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.सभेला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते.
konkansamwad 
