पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘पालकमित्र’ नियुक्ती....जलतारा व वनराई बंधाऱ्यांच्या कामांना मिळणार गती; लोकसहभागातून जलसंधारणावर भर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘पालकमित्र’ नियुक्ती....जलतारा व वनराई बंधाऱ्यांच्या कामांना मिळणार गती; लोकसहभागातून जलसंधारणावर भर

 

सिंधुदुर्ग



     सिंधुदुर्ग जिल्ह्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्याच्या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीला एक याप्रमाणे ४३३ ‘पालकमित्र’ नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले असून, संबंधित ग्रामपंचायतींसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी ‘पालकमित्र’ म्हणून काम पाहणार आहेत. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या आदेशाद्वारे संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २०२६-२७ साठी लोकसहभागातून वनराई व कच्चे बंधारे बांधण्याचे तालुकानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश्य परिस्थिती तसेच आगामी काळातील पाण्याची शक्यता लक्षात घेऊन जलपुनर्भरण, पाणीसाठा निर्मिती आणि पाणी बचतीच्या उपाययोजनांना गती देण्यासाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीत जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारे उभारण्याचे तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये २५ जलतारा निर्माण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.जलतारा व वनराई बंधाऱ्यांची कामे मोहीम स्वरूपात हाती घेऊन ती लोकसहभागातून जास्तीत जास्त प्रमाणात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सद्यस्थितीतील पर्जन्यमान व जलसाठ्याची परिस्थिती विचारात घेऊन गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी आणि जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करावी, असे आदेशात नमूद आहे.जलतारा व वनराई बंधाऱ्यांची कामे मुदतीत पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे पालकत्व स्वीकारणाऱ्या वर्ग १ व वर्ग २ अधिकाऱ्यांची ‘पालकमित्र’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित पालकमित्रांनी त्यांना नेमून दिलेल्या ग्रामपंचायतीमध्ये वनराई, कच्चे बंधारे व जलतारा बांधण्याच्या कामांवर देखरेख ठेवावी. संबंधित ग्रामपंचायत, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच इतर यंत्रणांशी आवश्यक समन्वय साधून कामांना गती द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत आणि नागरिक यांच्या समन्वयातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर राबविण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी पावसाचे पाणी अडविणे, जलसाठे निर्माण करणे आणि भूजल पुनर्भरणाला चालना देणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.