डॉ. शिवराम ठाकूर यांचा सेवापूर्ती सत्कार व सदिच्छा समारंभ संपन्न
मालवण
कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण यांच्या वतीने प्राचार्य डॉ. शिवराम अनंत ठाकूर यांचा ३९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेचा सेवापूर्ती सत्कार व सदिच्छा समारंभ संपन्न झाला. हा समारंभ स. का. पाटील सिंधुदुर्ग कला, वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गवाणकर विज्ञान महाविद्यालय, मालवण व कोकण जिओग्राफर असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १६ नोव्हेंबर रोजी कै. नरहरी प्रभूझांट्ये सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण, प्रभारी प्राचार्य श्री. कैलास राबते, सत्कारमूर्ती व माजी प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, सौ. सुखदा ठाकूर, सीडीसी अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर, संचालक डॉ. शशिकांत झांट्ये, डॉ. आर. एन. काटकर, सचिव गणेश कुशे, कोषाध्यक्ष नंदन देसाई, कोकण जिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. बी. पाटील व आयक्यूएसी सदस्य लक्ष्मीकांत खोबरेकर उपस्थित होते. यावेळी प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यमान प्राचार्य कैलास राबते यांनी सत्कारमूर्ती माजी प्राचार्य शिवराम ठाकूर यांच्या सेवाकार्याचा आढावा घेतला. सेवेदरम्यान श्री. ठाकूर यांनी महाविद्यालयाचा सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, मूल्यमापन पद्धतीतील सुधारणा, विद्यार्थ्यांसाठीचे उपक्रम, तसेच प्राध्यापकांमध्ये कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी मोलाचे योगदान दिले असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले आणि महाविद्यालयातील प्रत्येक घटकाशी समन्वय साधत, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची शैली प्रेरणादायी आहे असेही प्राचार्य श्री. राबते यांनी सांगितले.
प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी सत्कारमूर्ती माजी प्राचार्य शिवराम ठाकूर यांच्या मानपत्राचे वाचन केले व कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण आणि सर्व प्राध्यापकांच्या हस्ते सत्कारमूर्ती डॉ. शिवराम ठाकूर यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. शिवराम ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुखदा ठाकूर यांचा देखिल विशेष सत्कार करण्यात आला. प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.
यानंतर सर्व संस्था पदाधिकाऱ्यांसह डॉ. देविदास हारगिले, डॉ. सुमेधा नाईक, डॉ. उज्वला सामंत, डॉ. हंबीरराव चौगले, डॉ. एम. आर. खोत, प्रा. शंकर खोबरे, प्रा. हसन खान, प्रा. संग्रामसिंह पवार, प्रा. रामचंद्र तावडे, प्रा. स्नेहा बर्वे, प्रा. रोहिणी फाटक, डॉ. संकेत बेळेकर, शिक्षकेतर कर्मचारी, डॉ. शिवराम ठाकूर यांचे कुटुंबिय, आप्तेष्ट, स्नेही, विद्यार्थी व हितचिंतकांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी, कोकण जिओग्राफर असोसिएशन, माजी विद्यार्थी संघटना, एनसीसी विभाग, कुटुंबिय व अन्य मान्यवरांच्या वतीने डॉ. शिवराम ठाकूर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देत सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. शिवराम ठाकूर यांनी हा सत्कार व हे क्षण अत्यंत भावनिक आहेत असे सांगितले. सेवेतून निवृत्त होणे कठीण आहे परंतु निसर्ग नियमाप्रमाणे काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात त्याप्रमाणे आपल्याला स्वीकार हा केलाच पाहिजे. या संस्थेमध्ये प्राचार्य म्हणून रुजू होताना संस्थेने माझ्यावर विश्वास ठेवला आणि सर्व प्राध्यापक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जी मला साथ दिली त्यामुळेच हे शक्य झाले. याचे श्रेय महाविद्यालयाला आहे. ज्या घरामध्ये प्रेम, वात्सल्य, विश्वास असतो तोच माणूस आनंदाने घराची दारं उघडून बाहेर काम करू शकतो आणि त्याप्रमाणेच पत्नी सौ. सुखदा ठाकूर यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. एकत्रित कुटुंबामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. आपण सर्वांनी ज्या शब्दांत माझ्या कार्याचा गौरव केला, त्यासाठी मी संस्थेचा, महाविद्यालयाचा, कुटुंबियांचा शतशः आभारी आहे. महाविद्यालयाचा विकास हा कधीही एका व्यक्तीचा नसतो, ते सामूहिक प्रयत्नांचे फलित असते आणि मी केवळ त्या संघातील एक सदस्य होतो. यापुढेही विद्यार्थ्यांसाठी आणि महाविद्यालयासाठी मी नेहमीच उपलब्ध राहीन असेही सत्कारमूर्ती माजी प्राचार्य शिवराम ठाकूर यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात कार्याध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण यांनी डॉ. शिवराम ठाकूर यांनी या संस्थेत रुजू होताना जी वचनबद्धता दर्शवली होती त्याहीपेक्षा खूप प्रमाणात त्यांनी सेवेद्वारा दिले आहे अशी प्रशंसा केली. श्री. ठाकूर हे हरहुन्नरी, हसतमुख आणि सहकार्यास सदैव तत्पर असे व्यक्तिमत्व असल्याचे सांगत त्यांनी श्री. ठाकूर यांच्याविषयी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे सचिव चंद्रशेखर कुशे आणि सी. डी. सी. अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर यांनी त्यांच्या भाषणाद्वारे माजी प्राचार्य शिवराम ठाकूर यांच्या सेवेविषयी कृतज्ञता व्यक्त केली व सेवानिवृत्तीपर सदिच्छा दिल्या.
यावेळी संस्था पदाधिकारी, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, डॉ. शिवराम ठाकूर यांचे कुटुंबिय, विद्यार्थी, स्नेही, हितचिंतक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद खरात यांनी केले तर आभार डाॅ. एम. आर. खोत यांनी मानले.

konkansamwad 
