एस एस पी एम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय परिषद 'ICETEST 2k26' यशस्वीरीत्या संपन्न
कणकवली
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेली "इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन एमर्जिंग ट्रेंड्स इन इंजिनिअरिंग, सायन्स अँड टेक्नॉलॉजी (ICETEST 2k26)" ही आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाली.परिषदेच्या उद्घाट समारंभासाठी सुफॉल्क विद्यापीठ, यूके चे प्राध्यापक डॉक्टर भूषण बोंडे मुख्य अतिथि तर यू. जी. सी. चे सहसंचालक डॉक्टर मधुकर वावरे निमंत्रित अतिथि म्हणून लाभले. उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर सर यांनी अधोरेखित केले की नवकल्पनेतून नमूना आणि त्याचे व्यावसायिक उत्पादन घेणे यासाठी अभियंत्यानी प्रयत्न केले तर आपला देश आत्मनिर्भर बनण्याच्या दृष्टीने अग्रेसर होईल. मुख्य अतिथि डॉ. मधुकर वावरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये इनोवेशन चे महत्व प्रतिपादन केले आणि जास्तीत जास्त अभियंत्यानी नवकल्पनाच्या आधारे इनोवेटीव उत्पादने तयार करून आपल्या देशाला जागतिक स्तरावरील पहिल्या १० इनोवेटीव राष्ट्रामध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासारदर्भात आवाहन केले. परिषदेचे संयोजक डॉ. नितीन शिवशरण सर यांनी आभार व्यक्त केले आणि डॉ. सौरभ कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सुफॉल्क विद्यापीठ, यूके चे प्राध्यापक डॉ. भूषण बोंडे, यांनी कॉम्प्युटर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधि यांना जेनेटिक्स मधील अत्याधुनिक शोधाविषयी माहिती अवगत करून दिली जेणेकरून विद्यार्थी व शिक्षक यांना भविष्यातील संशोधन संधीविषयी मार्ग मिळेल.आयोजित या परिषदेत देश-विदेशातील संशोधक, प्राध्यापक, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्यात आला. अभियांत्रिकी, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या प्रवाहांवर आधारित विविध सत्रांमधून संशोधन व नवकल्पनांचा प्रभावी आदानप्रदान झाला. परिषदेत नामांकित तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्याने आणि विविध तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये सहभागी प्रतिस्पर्धी नी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अपारंपरिक ऊर्जा, स्मार्ट तंत्रज्ञान, प्रगत उत्पादन प्रणाली यांसारख्या अत्याधुनिक विषयांवर संशोधन निबंध सादर केले. या परिषदेमुळे संशोधकांना जागतिक स्तरावर आपले संशोधन सादर करण्याची संधी मिळाली तसेच शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढीस लागले. सहभागी विद्यार्थ्यांनीही या परिषदेतून नवीन तंत्रज्ञानाची माहिती व संशोधनाची दिशा मिळाल्याचे मत व्यक्त केले. सत्र अध्यक्ष आणि समीक्षक म्हणून प्रा. पी. एस. राणे, प्रा. एस. एस. नलावडे, डॉ. आर. डी. ठोंबरे, प्रा. ए. पी. गोसावी, डॉ. एम. के. साटम, प्रा. एस. वि. वंजारी, प्रा. एस. एम. सरवेकर, प्रा. एस. वि. हरणे तसेच विद्यार्थी समन्वयक तन्मय संतोष घोगळे, यश भोलानाथ पांचाळ, ओम विश्वजीत पारकर, गौरी माधवराव भोसले, भक्ती सत्यवान कदम आणि पवन दिपक तावडे यांनी जबाबदारी संपन्न केली.परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. आयोजक डॉ. नितीन शिवशरण सर यांनी सांगितले की, या परिषदेमुळे ज्ञानविनिमय, संशोधनवृद्धी आणि शाश्वत विकासासाठी नवे मार्ग खुले झाले आहेत. ही परिषद अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाला चालना देणारी ठरली असून भविष्यात अशाच दर्जेदार शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अंती प्राध्यापक तन्मय कदम यांनी एस एस पी एम अभियांत्रिकी विद्यालयाचे मॅनेजमेंट, प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर, संयोजक आणि सहसंयोजक, सर्व सत्र अध्यक्ष, सहाय्यक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सहभागी आणि विद्यार्थी प्रतिनिधि यांचे आभार व्यक्त केले.ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यासाठी संस्थेचे संस्थापक खासदार श्री नारायणराव राणे साहेब, अध्यक्षा सौ. नीलमताई राणे, उपाध्यक्ष आमदार डॉक्टर नीलेशजी राणे साहेब आणि सचिव मंत्री महोदय, श्री नितेशजी राणे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ही परिषद यशस्वीपणे संपन्न केल्याबद्दल प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी संयोजक डॉ. नितीन शिवशारण, सहसंयोजक डॉ. सौरभ कुलकर्णी व प्राध्यापक तन्मय कदम आणि विद्यार्थी प्रतिनिधि यांचे कौतुक केले.
konkansamwad 
