शासकीय बैठकीत कर्मचाऱ्याकडून मटका बघतानाचा व्हिडिओ व्हायरल....सावंतवाडी येथील घटना
सावंतवाडी
पंचायत समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा सुरू असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे एक जबाबदार कर्मचारी मोबाईलवर 'मटक्याचे आकडे' पाहत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंद्याच्या विरोधात घेतलेल्या कडक भूमिकेनंतर शासनातील कुंपण 'हाप्ते' खात असल्यानेच पुन्हा एकदा अवैध धंदे डोक वर काढत आहेत. याचाच प्रत्यय आज सावंतवाडीच्या बैठकीत शासकीय कर्मचाऱ्याच्या रूपाने पहायला मिळाला. बैठकीत लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित असताना गंभीर विषयावर सभागृहात चर्चा सुरू असताना बांधकामचे एक कर्मचारी मोबाईल ढवळत बसले होते. मोबाईलवर ते थेट मटक्याचे आकडे तपासत असल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे. त्याचा हा कारनामा मोबाईल कॅमेऱ्यात अचूक कैद करण्यात आला. कर्तव्यावर असताना मटका पाहणाऱ्या या अधिकारीचा व्हिडिओ आता सर्वत्र वेगाने व्हायरल होत आहे. दरम्यान, यावर सभापती सुस्मिता जाधव व उपसभापती गौरव मुळीक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबतची चर्चा खातेप्रमुखांशी करून योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती सभापती श्रीम. जाधव यांनी दिली.
याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता अंगद शेळके यांना विचारले असता, संबंधित व्यक्ती ही आपल्या विभागातील कर्मचारी आहे. त्यांच्याकडून याबाबत खुलासा मागितला असून वरिष्ठांकडून पुढील कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. .
konkansamwad 
