तुळस येथे १ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

तुळस येथे १ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

 

  वेंगुर्ला

 

      सामाजिक बांधिलकी जपत मानवतेचा संदेश देणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या पुढाकारातून लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लि. तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन तुळस येथे करण्यात आले आहे.हे रक्तदान शिबिर रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस (तुळस श्री देव जैतिराश्रीत संस्था मुंबई बहुउद्देशीय सभागृह) येथे होणार आहे. रक्तदान ही एक श्रेष्ठ सामाजिक सेवा मानली जाते. “रक्तदान हेच जीवनदान” या उदात्त विचारातून प्रेरणा घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अपघातग्रस्त, गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण तसेच विविध शस्त्रक्रियांदरम्यान रक्ताची तातडीची गरज भासते. अशा वेळी रक्तदातेच अनेक रुग्णांच्या जीवनरक्षणाचे महत्त्वाचे माध्यम ठरतात. उल्लेखनीय बाब म्हणजे, वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग (तुळस) यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारे हे सलग ३५ वे रक्तदान शिबिर असून, संस्थेच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची परंपरा अधोरेखित करणारा हा उपक्रम आहे. आयोजक संस्थांच्यावतीने तुळस व परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था तसेच सर्व सजग नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून मानवतेच्या कार्यात मोलाचा हातभार लावावा, असे आवाहन आयोजकाच्यावतीने विवेक तिरोडकर, दयानंद कुबल आणि गौरी जुवेकर यांनी केले आहे. रक्तदानासाठी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी महेश राऊळ(मो. ९४०५९३३९९२)यांच्याशी संपर्क साधावा.तुळस परिसरातील नागरिकांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.