वेंगुर्ला येथे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त १७ ते २० जुलै रोजी मान्सून महोत्सवाचे आयोजन. जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांची माहिती.

वेंगुर्ला.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्त्यात १७ ते २० जुलै दरम्यान मान्सून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ला शिवसेना कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी व्यापीठावर वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, युवा शहर प्रमुख संतोष परब, उपजिल्हा प्रमुख मोरजकर,जिल्हा संघटक सुनील डुबळे, शाखा प्रमुख संदेश होडवडेकर, शिरोडा उपतालुका प्रमुख कौशिक परब, सागरी सेना तालुका प्रमुख नार्वेकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री वालावलकर असे म्हणाले की केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी आहे.यानिमित्ताने वेंगुर्ला येथे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.आपल्या आमदारकीच्या तीन टर्ममध्ये केसरकर यांनी वेंगुर्ला तालुक्यातील अनेक विकासकामे पूर्णत्वास नेली आहेत.शिक्षणमंत्री झाल्यापासून त्यांनी तालुक्यातील जवळपास सर्वच गावांना विविध विकास कामांसाठी निधी दिला आहे.वेंगुर्ला तालुक्यात केसरकर लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत.त्यामुळे त्यांचा वाढदिवस वेंगुर्ला येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.यावर्षी आषाढी एकादशीच्या दुसऱ्याच दिवशी केसरकर यांचा वाढदिवस असल्याने आषाढी एकादशीलाच त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मान्सून महोत्सवाची सुरुवात होणार आहे. १७ रोजी आषाढी एकादशीचा जागर १७ जुलै रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून मान्सून महोत्सवांतर्गत सकाळी ९ वाजता 'बोलावा विठ्ठल' अभंग गायन स्पर्धा व सायंकाळी ५ वाजता 'महाराष्ट्रातले संत' या विषयावर वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग व सचिन बालावलकर मित्रमंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतर्गत शालेय मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाच ते दहा वर्षे, अकरा ते अठरा वर्षे व अठरा वर्षावरील खुला गट अशा तीन गटात अभंग गायन स्पर्धा होईल. तर बालवाडी, पहिली ते चौथी, पाचवी ते आठवी व नववी ते खुलागट अशा चार गटात वैशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. या दोन्ही स्पर्धा भटवाडी वेंगुर्ले येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात होणार आहेत.
१८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता दीपक केसरकर यांना दीर्घायुष्य लाभावे व ते आगामी निवडणुकीत चौथ्यांदा विक्रमी मतांनी आमदार व्हावेत यासाठी वेंगुर्ले बाजारपेठ येथील मारुती मंदिरात लघुरद्र विधी करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता वेंगुर्ले कॅम्प येथील वेंगुर्ले हायस्कूल नजीकच्या मैदानावर जय मानसीश्वर संघ व उभादांडा मित्रमंडळाने आयोजित केलेल्या खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.१०.३० वाजता वेंगुर्ले शहरातील प्राथमिक शाळांच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता सिद्धिविनायक मंगल कार्यालयात केरकर यांचा वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा साजरा होणार आहे. यावेळी केसरकर यांच्या माध्यमातून तुळस येथील वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेला देण्यात येणाऱ्या अद्ययावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. १८ ते २० रोजी दशावतार नाट्य महोत्सव शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पारंपरिक लोकलांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या यंदाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावर्षी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात तीन दिवशीय दशावतार नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार १८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. त्यानंतर देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाटधमंडळाचा 'क्षेत्रपाल श्री देव वेतोबा हा नाट्यप्रयोग होणार आहे. १९ रोजी सायंकाळी ६ वाजता 'भक्त पुंडलिक' हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. शनिवार २० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता 'काशी भविष्य कथन' हा नाविन्यपूर्ण संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. दोन्ही संयुक्त नाट्यप्रयोगात जिल्हयातील नामवंत दशावतारी कलाकार आपली कला प्रदर्शित करणार आहेत.या मान्सून महोत्सवात सादर होणाऱ्या कार्यक्रमांचा वेंगुर्लेवासीयांनी लाभ घ्यावा व दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वेंगुर्ला शिवसेनेतर्फे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, यांनी केले आहे.
यावेळी वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने काही नवीन नियुक्त्या करण्यात आल्या यामध्ये युवा उपतालुका संघटकपदी प्रितम सावंत, युवा शहर शाखा प्रमुखपदी प्रेमानंद जाधव, युवा शिरोडा विभाग प्रमुखपदी प्रथमेश बांदेकर, युवा शिरोडा बूथ प्रमुखपदी पराग नाईक, आडेली जि.प.मतदारसंघ युवा विभाग प्रमुखपदी सचिन परब, युवा शिरोडा शाखा प्रमुखपदी गौरव बर्डे यांना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली.
यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.