सिंधुदुर्गातील ३.६३ लाख वीज ग्राहकांना न्याय मिळावा.....सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची मागणी.....केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे दिले निवेदन
वेंगुर्ला
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने केंद्रीय वीज राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे निवेदन देऊन जिल्ह्यातील 3 लाख 63 हजार वीज ग्राहकांना 24 तास अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, अशी मागणी केली आहे.
संघटनेने म्हटले आहे की, महावितरणच्या आदेशानुसार पावसाळ्यापूर्वी देखभाल-दुरुस्तीचे काम फक्त 25 टक्के झाले आहे. उर्वरित 75 टक्के काम 15 दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत. प्रत्येक ग्राहकाला बिलासोबत CPL ची प्रत द्यावी, MERC कोडनुसार नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आहे. सुमारे 85 हजार ग्राहकांच्या घरातील पारंपरिक मीटर काढून जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोपही संघटनेने केला. संबंधित अधिकारी व अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आहे.दर महिन्याला ग्राहक मेळावे घेऊन जनजागृती करावी, सर्व उपविभागात मराठीत माहिती फलक लावावेत, आपत्कालीन वेळी 80 टक्के अधिकारी फोन उचलत नसल्याने त्यावर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनात आहेत. अर्जाला 6 महिने उलटूनही उत्तर न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी, असेही म्हटले आहे. निवेदनावर जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, सचिव साईनाथ आंबेरकर, अध्यक्ष संजय लाड, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संजय गावडे, सचिव जयराम वायंगणकर यांच्या स्वाक्षरीने निवेदन मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ला माजी उपनगराध्यक्ष रमण वायंगणकर, माजी उपसभापती सिद्धेश परब, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, शिवराम आरोलकर, भाई मंत्री आदी उपस्थित होते.
konkansamwad 
