महिलांना कापडी पिशवी प्रशिक्षणातून स्वावलंबनाची नवी संधी

महिलांना कापडी पिशवी प्रशिक्षणातून स्वावलंबनाची नवी संधी

 

कुडाळ

 

      ग्रामपंचायत वर्दे यांच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५ अंतर्गत कोकण कला व शिक्षण विकास संस्थामार्फत ०६ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील महिलांसाठी कापडी पिशव्या बनविण्याचे कौशल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच महादेव पालव यांच्या हस्ते झाले. उपसरपंच प्रदीप सावंत, ग्रामपंचायत सदस्य भक्ती सावंत, ग्रामपंचायत अधिकारी सपना मसगे, प्रशिक्षक स्मिता प्रभू, आरोग्य सेवक व अंगणवाडी सेविका तसेच संस्था समन्वयक समीर शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
       या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश प्लास्टिकमुक्त गावाची निर्मिती व टिकाऊ पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन देणे हा होता. टाकाऊ साहित्याचा उपयोग करून कापडी पिशव्या तयार करण्याचे कौशल्य महिलांना आत्मसात झाले. या माध्यमातून सिंधुदुर्गातील महिलांना घरबसल्या उत्पन्नाची संधी, स्वावलंबन, तसेच लघुउद्योग उभारणीचा मार्ग उपलब्ध झाला.संस्था समन्वयकांनी महिलांना व्यवसाय उभारणी, किंमत निर्धारण आणि मार्केटिंगविषयी मार्गदर्शन केले, जे त्यांच्या भविष्यातील व्यावसायिक प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. प्रशिक्षणात २४ महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
       ग्रामपंचायत अधिकारी सपना मसगे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले, तर सरपंच महादेव पालव यांनी सहभागी महिलांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हे प्रशिक्षण केवळ कौशल्य विकासापुरते मर्यादित न राहता सिंधुदुर्गातील महिलांसाठी आर्थिक सबलीकरणाचा भक्कम पाया ठरले.