अपघातातील जखमींना मदत करणारे नवीन ॲप

अपघातातील जखमींना मदत करणारे नवीन ॲप

 

कणकवली

 

       टाटा मोटर्स व बी.व्ही.जी. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  राष्ट्रीय गुड सेमेरिटन दिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन 'रस्ते सुरक्षा अॅप्लीकेशन कार्यान्वित होण्याच्या उद्देशाने सज्ज झाले आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यात गुड सेमेरिटन प्रशिक्षण कार्यशाळाही घेण्यात आली. रस्ते सुरक्षा वाढीच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेल्या या नवीन अॅप्लिकेशन ला 'गुड सेमेरिटन रस्ता सुरक्षा अॅप असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे रस्ते अपघातातील जखमींपर्यंत कमीत कमी वेळेत वैद्यकीय मदत पोहोचण्यासाठी सध्याच्या १०८ रुग्णवाहिका पाठविण्याच्या कार्य प्रणालीमध्ये या अप्लिकेशनचा सुयोग्य वापर करण्यात आला आहे. दरवर्षी १३ मार्च हा दिवस 'राष्ट्रीय गुड सेमेरिटन दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जास्तीत जास्त लोकांमध्ये अपघातग्रस्तांना मदत करण्याची सद्भावना जागृत करणे, अपघातग्रस्तांवर प्राथमिक उपचार करून त्यांची काळजी घेणे तसेच या अॅप्लिकेशनचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती अभियान बी.व्ही.जी. फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आले. त्या दृष्टीने राज्यभरात २७ ठिकाणी गुड सेमेरिटन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या.यामध्ये सुमारे १५०० लोकांना प्रशिक्षण देण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुष्पसन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी मधील सुमारे २०० विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात आले.स‌द्भावनेने प्रेरित होऊन अपघात किंवा एखाद्या दुर्घटनेतील जखमी व्यक्तीला मदत करणारा स्वयंसेवक म्हणजेच गुड सेमेरिटन. भारतात रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे. अशातच कायदेशीर कटकटीना घाबरून लोक मदतीस पुढे येत नाहीत. त्यामुळे वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब होतो. पर्यायाने सन २०१६ मध्ये  गुड सेमेरिटन कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे सामान्य लोकांना प्राथमिक उपचारात बाधा न आणता मदत करणाऱ्यास कायद्याचे संरक्षण मिळणार आहे. तसेच या मदत कार्यादरम्यान मदत करणाऱ्यांकडून काही चुका झाल्यास त्याला जबाबदार धरले जाणार नाही, अशी कायद्यात नमूद करण्यात आली आहे. याबाबत १०८ या रुग्णवाहिका सेवेचे जिल्हा व्यवस्थापक विनायक पाटील म्हणाले, आधुनिक एएल प्रणालीचा वापर करून अपघातग्रस्तांवर तात्काळ उपचार व्हावेत, यासाठी 'गुड सेमेरिटन रस्ता सुरक्षा अॅप' महत्वाचे ठरणार आहे. उच्च तंत्रज्ञान व सामान्य जनतेकडून अपघात प्रसंगी केले जाणारे सहकार्य यांच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा व आपतकालीन परिस्थितीत मदत वाढविणे हे या अॅपचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने अपघात अथवा दुर्घटनाप्रसंगी धावून जाणाऱ्या संवेदनशील व्यक्तींना प्रथमोपचार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लवकरच प्रादेशिक परिवहन विभागाच्या कॅम्पमध्येही प्रथमोपचार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही प्रथमोपचार प्रशिक्षण दिले जाणार असून त्यानंतर तालुकास्तरावर प्रशिक्षणे घेण्यात येणार आहेत.