सिंधुदुर्गातील शिक्षकांसाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे मैदानात.....उपसंचालकांची बोलावली उद्या तातडीची बैठक

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आता मैदानात उतरले आहेत.आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उद्या शिक्षण उपसंचालक महेश चोथे व माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची महत्त्वपूर्ण व तातडीची संयुक्त सभा बोलवत सहविचार सभेचे आयोजन केले आहे.या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होणार आहे. तर माध्यमिक शिक्षण विभागाकडून फाईलचा आणि कामांचा निपटारा होत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने तत्काळ बैठकीची मागणी केली होती.या अनुषंगानेच ही बैठक होत असून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराच्या विरोधात काय भूमिका उद्या घेते? तसेच नाराज असलेल्या अन्य संघटना काय भूमिका घेतात? याकडे सर्वाचे लक्ष्य लागून राहिले आहे.तर आमदार म्हात्रे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना आणि शिक्षण विभागाला या संदर्भात काय आदेश देतात? हे पाहण औत्सुक्याच ठरणार आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे पदभार स्वीकारल्यानंतर म्हणाव तशा पद्धतीने कामांचा निपटारा होत नाही आहे. या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांमध्ये नाराजीचा सूर आहे. अनेक शिक्षक व शिक्षकेतर संघटना या विरोधात आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. कालच अध्यापक संघाने ओरोस येथे या संदर्भात आंदोलन केले होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, सचिव नंदन घोगळे आणि कोकण कार्याध्यक्ष सलीम तकिलदार यांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याशी फोनद्वारे १५ जून रोजी चर्चा केली होती.त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रलंबित कामाबाबत तक्रारीचा पाढा त्यांनी आमदार महोदयांकडे वाचला होता. त्यानंतर या बैठकीचे आयोजन करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली होती.या अनुषंगाने तत्काळ आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षण उपसंचालक महेश यांना या बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश दिले होते. या आदेशान्वये शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. उद्या १९ जून रोजी ओरोस येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. ज्या ज्या शिक्षकांच्या आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या प्रलंबित आहेत, त्यांनी आपल्या तक्रार अर्जासह उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटना, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी उपस्थित रहावे असे आवाहन देखील म्हात्रे यांनी केले.