‘मोदी सेवा महिना’ उपक्रमा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवाभावी कार्यक्रम. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षा मार्फत सिंधुदुर्गातील आरोग्य शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद.

‘मोदी सेवा महिना’ उपक्रमा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवाभावी कार्यक्रम.   उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षा मार्फत सिंधुदुर्गातील आरोग्य शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद.

सिंधुदुर्ग.

   देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिनांक 17 सप्टेंबर 2024 ते दिनांक 16 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यभर "मोदी सेवा महिना" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
   उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध वैद्यकीय आस्थापने आणि इतर समाजसेवी संस्था यांच्या समन्वयातून ही सामाजिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत या उपक्रमाअंतर्गत राज्यभर पंचवीस हजार शिबिरांच्या माध्यमातून सुमारे 40 लक्ष नागरिकांच्या तपासण्या करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
   राज्यातील सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या भागात वैद्यकीय सभेपासून वंचित असलेल्या भागातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर लोकसहभागातून सामुदायिक आरोग्य शिबिरे राबविण्यात येत असून श्री. रामेश्वर नाईक हे या शिबिर आयोजन कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक आहेत.
   सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमांतर्गत सुमारे 250 वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक 23 सप्टेंबर पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या सामाजिक आरोग्य शिबिरांअंतर्गत सुमारे 35 सामुदायिक आरोग्य शिबीर संपन्न झाली आहेत. या शिबिरांना नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून पंधराशेपेक्षा जास्त नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेतला आहे. यामध्ये त्यांच्या 59 प्रकारच्या रक्त चाचण्या, ईसीजी तपासणी व इतर अनुषंगिक तपासण्या करण्यात आल्या आहेत. तसेच रोगाचे निदान झालेल्या रुग्णांवर शासकीय योजनांच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
   दलित वस्त्या, भटक्या जमातींच्या वस्त्या, जनजाती क्षेत्र, झोपडपट्ट्या, आर्थिक दुर्बल घटक अशा आरोग्य सेवेपासून वंचित असलेल्या भागात उपमुख्यमंत्री कार्यालया अंतर्गत कार्यरत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष विविध धर्मादाय संस्था, मेडिकल असोसिएशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्नित खाजगी वैद्यकीय महाविद्यालये व विद्यार्थी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालये, समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग या शिबिरांमध्ये आहे. भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीने या शिबिरांमध्ये समन्वयकाची भूमिका बजावून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.
   शिबिरामध्ये खालील बाबींचा समावेश आहे. नागरिकांचे स्क्रीनिंग करणे, रक्त तपासण्या करणे, इसीजी तपासणी करणे, आयुष्यमान भारत योजना कार्डचे वाटप करणे, आवश्यक औषधांचे वाटप करणे, रोगाचे निदान झाले आहे त्या रुग्णावर शासनाच्या आरोग्यविषयक योजनांच्या माध्यमातून उपचाराकरिता समन्वय साधणे, शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांची माहिती देणे, उपरोक्त तपासण्यांमध्ये रोगाचे निदान झाल्यास आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया किंवा पुढील उपचार शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना जसे धर्मादाय रुग्ण योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांच्या माध्यमातून मोफत उपचार करण्याबाबत समन्वय साधण्यात येणार आहे. तसेच वरील सर्व तपासण्या विनामूल्य असणार आहेत.
   सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी, होमिओपॅथिक कॉलेज वेंगुर्ला, जिल्ह्यातील नर्सिंग कॉलेज, अरवली वैद्यकीय केंद्र, रेडकर हॉस्पिटल रेडी, नागवेकर हॉस्पिटल कणकवली, एसएसपीएम, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग, जिल्हा शासकीय रुग्णालय इतर उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालये, जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालये यांच्या सहकार्याने आणि समन्वयाने संपूर्ण जिल्ह्यात ही शिबिरे घेण्यात येत आहेत.
   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विरळ लोकसंख्या आणि भौगोलिक रचनेचा विचार करता संभावित रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी बरेच परिश्रम करावे लागतात यासाठी जिल्ह्यामध्ये आमदार  नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्यालय प्रभारी प्रसन्न देसाई यांच्या सोबतच सर्व मंडल अध्यक्ष आणि इतर कार्यकर्ते भाजपा वैद्यकीय आघाडीसोबत अविरत प्रयत्न करत आहेत.