बॅ.नाथ पै यांचे विचार तरुणांनी आत्मसात करणे गरजेचे : खा.नारायण राणे. वेंगुर्ला येथे बॅ.नाथ पै समुदाय केंद्राचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न.

बॅ.नाथ पै यांचे विचार तरुणांनी आत्मसात करणे गरजेचे : खा.नारायण राणे.  वेंगुर्ला येथे बॅ.नाथ पै समुदाय केंद्राचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न.

वेंगुर्ला.

   बॅ.नाथ पै यांनी आपल्या जीवनात ज्या ज्या क्षेत्रात प्रवेश केला, त्या क्षेत्राचे नाव केले, समाजाचे नाव केले, देशाचे नाव केले. ज्या भागातून निवडून आले, त्या भागाला नावलौकिक मिळवून दिला. विकासाला चालना देण्यासाठी संसदेचा उपयोगही त्यांनी केला. त्यांच्यासारखी मोठी माणसे समाजाला केवळ देऊन गेले, घेऊन काय गेले नाहीत. नाथ पैंच्या विचारांचा पाठलाग करताना त्यांचे विचार तरुणांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. त्यांचे विचार, आचार, कर्तृत्व आजही आमच्या सोबत आहे, याचे कायम स्मरण ठेवून गावागावांतील लोकांमध्ये नाथ पै तयार करण्यासाठी योगदान द्या,' असे प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी येथे केले.
    वेंगुर्ला-कॅम्प येथे थोर संसदपटू बॅ.नाथ पै यांच्या नावाने साकारण्यात आलेल्या बॅ.नाथ पै समुदाय केंद्राचा लोकार्पण सोहळा शनिवारी संपन्न झाला. केंद्राचे लोकार्पण खासदार राणे यांच्या हस्ते व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर,जिल्हाधिकारी अनिल पाटील, पद्मश्री परशुराम गंगावणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा अदिती पै, नाथ पै यांचे कुटुंबीय शैलेंद्र पै, शशिकांत पै, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, प्रशासक हेमंतनिकम, मुख्याधिकारी परितोष कंकाळ आदी उपस्थित होते.
  यावेळी उद्योगमंत्री सामंत म्हणाले, 'बॅ. नाथ पैंचे नेतृत्व, कतृत्व एवढे आहे की, ते शब्दांत मांडू शकत नाही. नाथ पैंच्या पुस्तक प्रकाशनाला मी उपस्थित होतो. स्मारक उभे करताना मला खारीचा वाटा उचलता आला, हे मी माझे भाग्य समजतो. या स्मारकाची संकल्पना मांडली, तेव्हा विरोधाला विरोध न करता खासदार राणे यांनीही याला पाठिंबा दिला. हे नुसते स्मारक नसून, ते विचारंचे स्मारक आहे.'
    अदिती पै यांनी या समुदाय केंद्रासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.ज्येष्ठ पत्रकार ठाकूर यांनी नाथ पै यांच्या आठवणींना उजाळा देला. या कार्यक्रमाला बॅ. नाथ पै महाविद्यालयाचे चेअरमन उमेश गाळवणकर, व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजचे चेअरमन व्हिक्टर डान्टस, उद्योजक भाई मंत्री, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आर्किटेक्ट अमित कामात, मुख्याधिकारी परितोष कांकाळ यांचा खासदार राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत वेंगुर्ले नगरपरिषदेचे प्रशासक हेमंत निकम यांनी, प्रास्ताविक मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी मानले.