दाभोली इंग्लिश स्कूल, दाभोली यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

दाभोली इंग्लिश स्कूल, दाभोली यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

 

वेंगुर्ला 

 


         वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीच्या दाभोली इंग्लिश स्कूल, दाभोली येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित डी.इ.एस.इन्स्पिरेशन डेमॉन्स्ट्रेशन सायन्स फेअर आयोजित करण्यात आले होते.सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर यांच्या संकल्पनेतून आणि विज्ञान शिक्षक वसंत पवार यांच्या प्रयत्नातून अत्यंत उत्साहात हा उपक्रम पार पडला. या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. यावेळी प्रयोगशाळेतील दैनंदिन वापरातील साहित्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या साहित्याची मराठी आणि इंग्रजी नावे त्याचबरोबर त्यांचे उपयोग याबद्दल विद्यार्थ्यांनी योग्य माहिती दिली. शाळेत जोडलेल्या इंटरॅक्टिव्ह बोर्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन केले जाते याबाबतचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी हा इंटरॅक्टिव्ह बोर्ड विद्यार्थी अगदी सहज हाताळताना दिसले.
       सदर कार्यक्रमाचे उद्घाटन अणसुरपाल हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी या उपक्रमांचे कौतुक करत शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रतिकृतींची पाहणी करत त्यांना मार्गदर्शन देखील केले. रा.धो. खानोलकर हायस्कूल मठचे मुख्याध्यापक सुनील जाधव व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर गोलतकर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले. याबद्दल विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे किशोर सोन्सुरकर यांचे आभार सुनील जाधव यांनी व्यक्त केले.