पंकजा मुंडे, भावना गवळी, सदाभाऊ खोत, मिलींद नार्वेकर ते प्रज्ञा सातव, विधानपरिषदेच्या नवनिर्वाचीत ११ आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न.
मुंबई.
विधानपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व ११ आमदारांचा शपथविधी सोहळा आज संपन्न झाला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेदेखील उपस्थित होते. आमदार योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार निवडणूक आले होते. तर शेकपाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत महायुतीने 9 जागा जिंक्ल्या तर महाविकास आघाडीने 2 जागा जिंकल्या होत्या, 12 उमेदवारांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमका कोण विजयी होणार याची उत्कंठा लागून राहिली होती. अखेर, मिलिंद नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटल्याचं प्रथमदर्शन दिसून येत आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भाजप महायुतीचा वरचष्मा दिसून आला होता.
विधानपरिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच काँग्रेसची मतं फुटणार, अशी चर्चा होती. या निवडणुकीत अजित पवार गटाला दोन उमेदवार निवडून आणणे कठीण होते. त्यासाठी त्यांना अतिरिक्त मतांची गरज होती. विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यावर शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांनी पहिल्या पसंतीची 23 मतं मिळवत विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसची 8 मतं फुटल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपची यंग ब्रिगेड विधानपरिषदेत दिसणार आहे. भाजपचे योगेश टिळेकर, परिणय फुके, पंकजा मुंडे आणि अमित गोरखे यांचा विजय झाला. अमित गोरखेंच्या रूपानं मातंग समाजातील तरूण चेहरा विधानपरिषदेत दिसणार आहे. तर योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळाले आहे. याशिवाय, सदाभाऊ खोत यांच्या रूपात शेतकरी आणि चळवळीत कार्यकर्ता पुन्हा आमदार झाला आहे.