रशियाचा युक्रेनच्या सुमी शहरावर क्षेपणास्त्र हल्ला.....३४ ठार, ११७ जखमी

रशिया
रशियाने युक्रेनमधील सुमी शहरावर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात ३४ जणांचा मृत्यू झाला, तर ११७ जण जखमी झाले, ज्यात १५ मुलांचा समावेश आहे. युक्रेन आणि रशियासाठी अमेरिकेचे विशेष दूत कीथ केलॉग यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. अमेरिका युद्धबंदीसाठी प्रयत्न करत असताना रशियाने युक्रेनवर हा हल्ला केला आहे. कीथ केलॉग यांनी अलीकडेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली होती. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही या हल्ल्याबद्दल दुख व्यक्त केले आहे.कीथ केलॉग यांनी म्हटले आहे की, रशियन सैन्याने सुमी येथील नागरीकांवर केलेला हल्ला कोणत्याही सभ्यतेची सीमा ओलांडतो. यात अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. माजी लष्कर प्रमुख म्हणून मला हा हल्ला चुकीचा असल्याचे समजते. म्हणूनच अमेरिका हे युद्ध संपवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत. अमेरिका कोणत्याही परिस्थितीत हे युद्ध संपवण्यासाठी मध्यस्थीची भूमिका बजावत राहील.युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुमी शहरावर रशियाने दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये सुमी स्टेट युनिव्हर्सीटी आणि आसपासच्या परिसरात मोठे नुकसान झाले. हल्ल्यानंतर रस्त्यांवर रक्ताने माखलेले मृतदेह आणि अनेक जखमी नागरिक होते. यूक्रेनने सांगितले की, या हल्ल्यात २० इमारतींचे मोठे नुकसान झाले. यामध्ये चार शैक्षणिक संस्था आहेत. क्षेपणास्त्रांमध्ये क्लस्टर युद्धसामग्री भरलेली होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला.