रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा सुटला; भाजपकडून नारायण राणे यांच्या नावाची घोषणा.
रत्नागिरी.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा तिढा अखेर सुटला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. या जागेवर दोन्ही पक्षांनी दावा केला होता. अखेर रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला मिळालेली आहे. भाजपने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे इच्छूक होते. तसेच या जागेवर शिवसेना शिंदे गटाने देखील दावा केला होता. या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे किरण सावंत हे इच्छुक होते. मात्र आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून सुरू असलेला वाद संपला आहे. या जागेवर महायुतीचे उमेदवार नारायण राणे असणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार नारायण राणे हे निवडणुकीच्या रिंगणात असतील.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आज आणखी एक यादी जाहीर झाली आहे. या यादीत भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच नारायण राणे यांनी ४ उमेदवारी अर्ज घेतले होते. तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर ४ उमेदवारी अर्ज घेतले होते.
दरम्यान, नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांचा अर्ज भरताना आम्ही त्यांच्यासोबत राहू असं स्पष्ट करत कोणताही वाद नसल्याचं त्यांनी सागितले.