तब्बल १० तासांनी मालवण तळाशील महिलांचे उपोषण स्थगित.

मालवण.
कालावल खाडी पात्रातील गट क्र.१ मधील वाळू उपसा कायम स्वरूपी बंद करावा.तसेच तळाशीलवाडी समोरील नदी पात्रात तात्काळ डेंजरिंग करून किनाऱ्याची वाहून गेलेली वाळू किनाऱ्याला टाकण्यात यावी. बेसुमार वाळू उपसामुळे किनाऱ्याला असलेले कांदळवन धोक्यात आले असून त्याच्या संरक्षणासाठी कांदळवन प्रतिनिधीची कायम स्वरूपी नेमणूक करावी. या प्रमुख मागण्यासाठी काल प्रजासत्ताक दिनी तळाशील येथील महिलांनी खाडीपात्रात ग्रामस्थांसह उपोषण सुरु केले. तहसीलदार वर्षा झालटे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत ग्रामस्थांची बैठक घेण्याचे लेखी आश्वासन महिलांना दिल्यानंतर तब्बल १० तासांनी आपले पाण्यात उतरून सुरू केलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले.
प्रांतधिकारी ऐश्वर्या काळुशे व तहसीलदार वर्षा झालटे या तळाशील येथे २५ रोजी झालेल्या चर्चेनंतर महिला खाडीतील उपोषणावर ठाम राहिल्याने काल सकाळी १० वाजता तळशील येथील महिला व ग्रामस्थांनी तळाशील येथे खाडीपात्रात उतरून घोषणाबाजी करत खाडीतील उपोषणास सुरुवात केली. सुरवातीला प्रशासना कडून मालवण पोलीस, आरोग्य सेविका, आचरा मंडळ अधिकारी अजय परब, तलाठी जाधव हजर झाले होते.
सकाळ पासून भर उन्हात खाडीपात्रात बसून महिलांनी आपले उपोषण तीव्र केले होते. पाण्यात बसलेल्या काही महिलांना त्रास जाणवू लागला होता मात्र त्यांनी बाहेर येण्यास नकार देत उपोषण सुरूच ठेवले होते. त्यातील एका महिलेला फिट्स येऊन प्रकृती खालवत ती बेशुद्ध पडली होती. उपस्थित असलेल्या आरोग्य सेविका यावेळी उपचार करण्यासाठी कोणीही वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. शेवटी १०८ रुग्णवाहीका पाचारण करत त्या महिलेला अधिक उपचारासाठी मालवण येथे हलविण्यात आले. महिलेची प्रकृती खालवल्याची माहिती मिळाल्यानंतर उशिराने आचरा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व स्टाफ दाखल होताच त्याना ग्रामस्थांच्या रोषाला समोरे जावे लागले.
सायंकाळी ५ वाजता मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांच्यासह बंदर विभागाचे अधिकारी, मालवण पोलीस निरीक्षक दाखल होताच ग्रामस्थ आक्रमक झाले होते. प्रशासन महिलांच्या मरणाची वाट बघत आहे का? असा संतप्त प्रश्न उपोषणस्थळी ग्रामस्थांनी केला. मागण्या मान्य होत नसतील तर पाण्यातून जीव गेला तरी हटणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी तहसीलदार यांनी महिला व ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. येत्या आठ दिवसात आपण यावर तोडगा काढू असे सांगितले. परंतु यावर ग्रामस्थ समाधानी नव्हते. तुम्हाला १५ दिवस निवेदन देवून न्याय देऊ शकला नाहीत तर आठ दिवसात कसा देणार असा प्रश्न ग्रामस्थांनी केला. तहसीलदार वर्षा झालटे यांच्यासह बंदर विभागाचे अधिकारी, पोलीस निरीक्षक दाखल होताच खाडीत उपोषण स्थळापासून सकाळ पासून उभ्या असलेल्या वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या होड्या पळवण्यात आल्या.
तळाशील महिला खाडीपात्रातून बाहेर पडण्यास तयार होत नव्हत्या. तहसीलदार वर्षा झालटे या महिलांशी वारंवार चर्चा करून आंदोलन थांबविण्यास विनंती करत होत्या. परंतू महिला उपोषणावर ठाम होत्या. तुमच्याकडून मागण्या पूर्ण होत नसतील तर जिल्हाधिकाऱ्यांना पाचारण करा अशी मागणी लावून धरली होती. शेवटी तहसीलदारांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करत सोमवारी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत ग्रामस्थांची बैठक घेण्याची वेळ निश्चित केली व याचे लेखी आश्वासन महिलांना देत असल्याचे सांगितले. तसेच वाळू उपसा रोखण्यासाठी महसूलचे पथक २४ तास ठेवणार असल्याचे सांगितल्यानंतर तब्बल १० तासांनी महिलांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले.