कुडाळ येथे लोकसभा विधानसभा निवडणूक मतदान यंत्राच्या जनजागृती अभियानचा शुभारंभ.
कुडाळ.
लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने ई.व्ही.एम्. व्ही. व्ही. पॅट’ मतदान यंत्रांसंदर्भात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानाचा शुभारंभ कुडाळ प्रांत कार्यालय येथे करण्यात आला.तर कुडाळ हायस्कूल येथे प्रथम प्रात्यक्षिकासह माहिती देऊन सुरुवात करण्यात आली. या मतदार संघासाठी दोन मोबाईल व्हॅन देण्यात आल्या आहेत. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे हे अभियान राबविले जात आहे. २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय, तसेच मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) यांच्या कणकवली,कुडाळ व सावंतवाडी येथील कार्यालयात मतदान यंत्र प्रात्यक्षिक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कुडाळ, मालवण विधानसभा मतदार संघात सदर अभियान सुरुवात करण्यात आले आहे. कुडाळ व मालवण तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे ही जनजागृती करण्यात येणार आहे.या मतदार संघातील या मोहिमेचा शुभारंभ कुडाळ प्रांत कार्यालय येथे कुडाळच्या उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) ऐश्वर्या काळुशे यांच्या हस्ते करण्यात आला. कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक, कुडाळचे प्रदीप पवार, अव्वल कारकून संजीवनी खानोलकर व कर्मचारी उपस्थित होते.
कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे या जनजागृती अभियान कार्यक्रमाअंतर्गत प्रथम प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. महिला पोलिस योगिता गोलतकर महसूल सहाय्यक (निवडणूक ) सागर बांदल, मंडळ अधिकारी डी.व्ही. तेली, मंडळ अधिकारी धनजय सिंगनाथ, अव्वल कारकुन नरेंद्र एडके, महसूल सहाय्यक दीपक नाईक, डाटा ऑपरेटर सचिन गवस, कोतवाल ओमकार मंचेकर,सागर गोसावी तसेच कुडाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. दिनेश आजगावकर व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. मतदारांनी मतदान यंत्रांचा वापर कसा करावा तसेच या यंत्राचे कार्य काय ? याची माहिती घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी केले आहे.