महिलांनी बचत गटाच्‍या माध्‍यमातून नवीन व्‍यवसाय सुरु करण्‍यासाठी सिंधुरत्‍न समृद्ध योजनेचा लाभ घ्‍यावा : मंत्री दीपक केसरकर. नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहामधील कॅन्‍टीनचा उद्घाटन सोहळा संपन्न.

महिलांनी बचत गटाच्‍या माध्‍यमातून नवीन व्‍यवसाय सुरु करण्‍यासाठी सिंधुरत्‍न समृद्ध योजनेचा लाभ घ्‍यावा : मंत्री दीपक केसरकर.  नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहामधील कॅन्‍टीनचा उद्घाटन सोहळा संपन्न.

वेंगुर्ला.

   महिलांनी स्‍वयंपूर्ण होण्‍यासाठी तसेच त्‍यांची आर्थिक उन्‍नती होवून महिला सक्षमीकरणासाठी सिंधुरत्‍न समृद्ध योजनेअंतर्गत अन्‍न प्रकिया उदयोग, कृषी यांत्रिकीकरण, पशुपालन, कुक्कुटपालन, पर्यटन अशा प्रकारच्‍या विविध व्‍यवसायांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्‍यात येणार आहे. यासअनुसरुन जास्‍तीत जास्‍त महिलांनी वैयक्तिकरित्‍या अथवा महिला बचत गटाच्‍या माध्‍यमातून अनेक नवीन व्‍यवसाय सुरु करण्‍यासाठी या योजनेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला येथे बोलताना केले.
  सिंधुरत्‍न समृद्धी योजना अंतर्गत महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा व नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहामधील कॅन्‍टीनचा उद्घाटन सोहळा मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत संपन्‍न झाला. याप्रसंगी वेंगुर्ला नगरपरिषदेचे प्रशासक प्रशांत पानवेकर, मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ, तहसिलदार ओंकार ओतारी, डॉ.आनंद तेंडुलकर, प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक, सिंधुरत्‍न समृद्धी योजना, श्री.योगेश वालावलकर, क्षेत्रीय अधिकारी, प्रधानमंत्री सूक्ष्‍म अन्‍न प्रक्रिया उदयोग (PMFME) शिवसेना जिल्हा संघटक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम तसेच वेंगुर्ला शहरातील विविध बचत गटातील महिला, पत्रकार व नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
   यावेळी बोलताना मंत्री केसरकर असे म्हणाले की, या योजनेअंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या सर्व उदयानांमध्‍ये व पर्यटन स्‍थळी छोटी कॅन्‍टीन उभारण्‍यात येवून जास्‍तीत जास्‍त रोजगार निर्मिती करण्‍यात येणार असल्‍याचे सांगितले. जानेवारीच्‍या पहिला आठवडयात भव्‍य महिला मेळावा आयोजित करुन प्रत्‍यक्ष लाभार्थ्‍यांसोबत सुसंवाद साधणार असल्‍याचे मत शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री, महाराष्‍ट्र तथा सिंधुरत्‍न समृद्धी योजनेचे अध्‍यक्ष आम.दिपक केसरकर यांनी व्‍यक्‍त केले.
   डॉ.आनंद तेंडुलकर, प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक, सिंधुरत्‍न समृद्धी योजना व श्री.योगेश वालावलकर, क्षेत्रीय अधिकारी, प्रधानमंत्री सूक्ष्‍म अन्‍न प्रक्रिया उदयोग (PMFME) यांनी या योजनेबाबत विस्‍तृतपणे माहिती देवून योजनेचा लाभ घेणेकामी आवश्‍यक प्रकियेबाबत मार्गदर्शन केले. तदनंतर वेंगुर्ला नगरपरिषदेचे प्रशासक श्री. प्रशांत पानवेकर यांनी जास्‍तीत जास्‍त महिलांनी या योजेनेचा लाभ घ्‍यावा व आपली आर्थिक प्रगती साध्‍य करावी असे मत व्‍यक्‍त केले.
   सिंधुरत्‍न योजनेची जनजागृती करण्‍यासाठी तसेच सदर योजनेबाबत महिलांच्‍या  विविध अडचणी जाणून घेवून त्‍यांचे निराकारण  करण्‍यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या नागरी सुविधा केंद्रामध्‍ये नियमितपणे एक खिडकी कार्यन्वित करण्‍यात येईल तसेच जास्‍तीत जास्‍त  महिलांनी या योजनेचा लाभ घेवून रोजगाराच्‍या विविध संधी निर्माण करुन आपले जीवनमान उंचवावे असे मत मुख्‍याधिकारी  परितोष कंकाळ यांनी व्‍यक्‍त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. काका सावंत यांनी केले.