युवासेनेच्या माध्यमातून मोफत नेत्र आणि मोतीबिंदू चिकित्सा शिबिर. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती.

युवासेनेच्या माध्यमातून मोफत नेत्र आणि मोतीबिंदू चिकित्सा शिबिर.  युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती.

कणकवली.

    युवासेनेच्या माध्यमातून कणकवली विधानसभा मतदारसंघात ६ ठिकाणी मोफत नेत्र आणि मोतीबिंदू चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आली आहे. या शिबिरात आढळलेल्या सर्व मोतीबिंदू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया ओरोस येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांच्या प्रवास आणि जेवनाची व्यवस्था युवासेना करणार आहे अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली.
  विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत, युवासेना देवगड तालुकाप्रमुख फरीद काझी, वैभववाडी तालुकाप्रमुख रोहित पावसकर, कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री, नितेश भोगले, दत्तप्रसाद धुरी, संतोष ठुकरुल आदी उपस्थित होते.  सुशांत नाईक म्हणाले, कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील गोरगरीब जनतेला दिलासा मिळाला म्हणून युवासेनेने मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. हे शिबिर सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेमध्ये ६ डिसेंबर रोजी शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, ७ डिसेंबर रोजी फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, १० डिसेंबर रोजी कलमठ, १६ डिसेंबर रोजी वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, २१ डिसेंबर रोजी कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्र, २३ डिसेंबर रोजी पडेल प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी होणार आहे. या आरोग्य शिबिरात सहभागी रुग्णांचा बीपी, मधुमेह आदी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुशांत नाईक यांनी केले आहे.
   श्री नाईक म्हणाले, आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून विविध ठिकाणी आंदोलने करून शासनाला जाग आणण्याचे काम आम्ही करत आहोत. कणकवली विधानसभा मतदारसंघातील आरोग्य यंत्रणा खिळखिळी होण्यास सर्वस्वी जबाबदार येथील स्थानिक आ. नितेश राणे आहेत. आ. राणे हे रुग्णकल्याण समितीचे अध्यक्ष असूनही त्याने आरोग्य विभागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आ. राणे हे आंतरराष्ट्रीय दौरे करत आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय दौरे न करता आपल्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आ. राणे हे पडवे मधील स्वतःचे खाजगी हॉस्पिटल चालावे म्हणून आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्ष करत असल्याची टीकाही श्री. नाईक यांनी केली.