माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

कणकवली
ओसगांव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांना राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा बेळगांव यांचा राष्ट्रीय सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २९ ऑक्टोबरला बेळगांव येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे. त्यासाठी कर्नाटक तसेच महाराष्ट्र व अन्य राज्यातील मंत्री, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे.दिल्ली, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या पाच राज्यांतील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, केंद्रीय मंत्री यांचे अभिनंदनपत्र, म्हैसूर फेटा, चंदनाचा कायमस्वरुपी हार असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारांसाठी जिल्हयांतील प्रमुख पोलीस कार्यालयांशी संपर्क साधून विविध क्षेत्रांतील उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची माहिती मागविली जाते.बबली राणे हे गेली २५ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेषतः महामार्गवर अपघात होतात, त्यावेळी जखमींना रुग्णालयांमध्ये पोहोचविण्यात ते महत्वाची भूमिका वर्षानुवर्षे बजावत आहेत. अन्य सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग असतो. तर ओसरगांव ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदही त्यांनी भुषविले आहे. विशेष म्हणजे ओसरगांव येथील तलाव पर्यटनदृष्ट्या विकसीत व्हावे व त्यासाठी आवश्यक तेवढा निधी मिळावा, या मागणीसाठी त्यांनी केलेले उपोषणही लक्षवेधी ठरले होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आतापर्यंत केलेल्या कामाची पोचपावती या पुरस्काराच्या रुपाने मिळाली अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली.