सिंधुदुर्गात ईद-उल-फितरचा पवित्र सण उत्साहात संपन्न
सिंधुदुर्ग
पवित्र रमजान महिन्यातील ३० दिवसांच्या खडतर रोजानंतर, संयम, त्याग आणि ईश्वरी भक्तीचे फळ म्हणून मानला जाणारा ईद-उल-फितर हा सण सिंधुदुर्गात अत्यंत भक्तीमय आणि अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील विविध मस्जिदमध्ये अकीदतचा म्हणजे श्रद्धेचा महापूर लोटल्याचे पाहायला मिळाले. रमजान पर्वाचे सर्वात मोठे आध्यात्मिक आकर्षण म्हणजे महिनाभर चाललेले विशेष तरावीह नमाज पठण होय. मशिदीमध्ये मुस्लिम धर्मगुरूंनी अत्यंत मधुर आणि पहाडी आवाजात, पूर्ण भक्तीभावाने ३० दिवसांच्या तरावीह नमाजमध्ये संपूर्ण कुराण शरीफचे पठण पूर्ण केले.शेकडो मुस्लिम बांधवांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ईदची विशेष नमाज अदा केली.नमाज पठण पूर्ण झाल्यानंतर विशेष खुतबा पठण करण्यात आले, ज्यामध्ये त्यांनी कुराण आणि हदीसच्या प्रकाशात ईदचे आध्यात्मिक महत्त्व विशद केले. हा सण केवळ आनंदाचा नसून तो आपल्यातील अहंकार त्यागून गरिबांना फितरा म्हणजे दान देऊन त्यांनाही आनंदात सहभागी करून घेण्याचा आणि मानवतेची सेवा करण्याचा पवित्र संदेश देणारे असते.नमाज आणि खुतबा संपल्यानंतर सर्व भाविकांनी हात पसरून अत्यंत भावूक अंतःकरणाने सामूहिक दुआ केली. यावेळी जिल्ह्यासह संपूर्ण देशात सुख, शांती, समृद्धी आणि आपापसातील सलोखा कायम राहावा, अशी आर्जवी विनंती करण्यात आली. दुआ पूर्ण होताच सर्व भाविकांनी अत्यंत श्रद्धापूर्वक सलाम पठण केले आणि नमाजची सांगता झाली. यानंतर लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाने एकमेकांना घट्ट अलिंगन म्हणजेच गळाभेट दिली. ईद मुबारक म्हणत एकमेकांना दिलेल्या शुभेच्छांनी वातावरणात प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा ओलावा निर्माण केला. सिंधुदुर्ग पोलीस यांनी प्रशासनाच्यावतीनेही चोख बंदोबस्त ठेवण्यासोबतच सर्व बांधवांना ईदच्या शुभेच्छा देऊन सामाजिक बांधिलकी जपली. अशा प्रकारे, अध्यात्म, कुराण पठणाची भक्ती, आलिंगनातून व्यक्त झालेल्या प्रेमभावामध्ये सिंधुदुर्गात ईद-उल- फितरचा उत्सव अत्यंत थाटात आणि धार्मिक उत्साहात पार पडला.
konkansamwad 
