सावंतवाडी तालुक्यात महिनाभर भरणार 'दाखल्यांची शाळा'

सावंतवाडी
उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी आवश्यक दाखले त्यांच्या गावात, शाळेतच मिळावेत यासाठी सावंतवाडी तालुक्यातील सर्व शाळा व ग्राम महसूल कार्यालयात एप्रिल महिन्यात 'दाखल्यांची शाळा' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.तहसीलदार पाटील म्हणाले, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी प्रवेश घेणे, शिष्यवृत्ती लाभ मिळवणे अथवा सरकारी नोकरी साठी अर्ज दाखल करणे यासाठी जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी दाखल्यांची आवश्यकता असते. परंतु अनेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांना या दाखल्यांबाबत पुरेसी माहिती नसते. जेव्हा शाळा, महाविद्यालयांकडून प्रवेश अथवा शिष्यवृत्तीसाठी या दाखल्यांची मागणी करण्यात येते, तेव्हा विद्यार्थी व पालक यांची धावपळ सुरु होते. त्यामध्ये प्रामुख्याने जातीचे जुने पुरावे शोधण्यापासून ते अर्ज दाखल करण्यापर्यंत वेळ वाया जातो, असा सर्व सामान्य अनुभव आहे. त्यामुळे शालेय स्तरावरच दाखले नोंदणी शिबिर आयोजित करून दाखल्यांचे वितरण करण्यासाठी तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मध्ये उन्हाळी सुट्टीत 'दाखल्यांची शाळा' हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितले. हा उपक्रम मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आणि प्रांताधिकारी सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात राबविण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार श्रीधर पाटील व सर्व महा ई-सेवा केंद्र चालक यांच्या मार्फत करण्यात येत आहे.दाखले काढण्यासाठी विद्यार्थी व पालक यांची होणारी धावपळ थांबवणे, एका छताखाली सर्व दाखले उपलब्ध करून देणे, मध्यस्थ व्यक्तीकडून दाखल्यांसाठी विद्यार्थी व पालक यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवणे, विद्यार्थी - पालक यांच्या श्रमाची व पैशाची बचत करणे, लोकाभिमुख प्रशासन राबवणे व रुजवणे हा उद्देश आहे. या उपक्रमातून ग्राम महसूल अधिकारी यांचे स्तरावरील उत्पन्न अहवाल तर जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी दाखल्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर गावातच विद्यार्थ्यांना दाखले वितरण करण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅपद्वारे डिजिटल सहीचे दाखले देखील या उपक्रमात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.