मच्छीमारांसाठी खुशखबर! बंद काळात मिळणार २२ हजारांचे अनुदान, मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा
मालवण, ता. १९
आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गरजू मच्छीमारांनाही मासेमारी बंद काळात थेट २० ते २२ हजार रुपयांचे आर्थिक अनुदान देण्याचे शासनाचे नियोजन असल्याची मोठी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.आंध्र प्रदेशात माशांच्या प्रजनन काळात मासेमारी बंद असताना गरजू मच्छीमारांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे विशेष आर्थिक सहाय्य दिले जाते. याच धर्तीवर महाराष्ट्रातही किनारपट्टीवरील मच्छीमार कुटुंबांना संकट काळात आर्थिक आधार देण्यासाठी शासन स्तरावर जोरदार हालचाली सुरू आहेत.दरवर्षी पावसाळ्यात माशांच्या प्रजननासाठी काही महिने समुद्रात मासेमारी करण्यास पूर्णपणे बंदी घातली जाते. या काळात मच्छीमारांचे काम ठप्प होऊन त्यांच्या हातात कोणतीही कमाई अथवा रोजगाराचे साधन उरत नाही. नवीन हंगाम सुरू होण्याची वाट पाहत अनेक महिने त्यांना घरातच काढावे लागतात, ज्यामुळे हजारो कुटुंबांसमोर आर्थिक चणचण निर्माण होते.या बिकट परिस्थितीत मच्छीमार कुटुंबांना थेट आर्थिक हातभार लावण्यासाठी २० ते २२ हजार रुपयांचे अनुदान देण्याची योजना आखली जात असून, लवकरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
konkansamwad 
