सावंतवाडीत शिवशाही बसच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

सावंतवाडीत शिवशाही बसच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

सावंतवाडी


       शिवशाही बस स्थानक मधून बाहेर काढत असताना मागील बाजूची धडक बसून झालेल्या अपघातात कोलगाव येथील तरुण गंभीर जखमी झाला. उल्हास सुरेश कोरगावकर (वय ३९, रा. कोलगाव) असे त्याचे नाव आहे. दरम्यान या अपघातानंतर त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. जखमीची आई शुभांगी कोरगावकर हिने दिलेल्या तक्रारीनुसार मेकॅनिक चालक संदेश प्रभाकर अकलेकर (वय ३४, रा. उभादांडा-वेंगुर्ला) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील गाडीचे चालक हे आपल्या ताब्यातील शिवशाही बस घेऊन बस स्थानकामधून बाहेर पडत होते. यावेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका तरुणाला मागील बाजूने बसचा काही भाग लागला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याने आरडाओरडा केल्यानंतर बाजूला असलेल्या लोकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ त्या बसचालकाला थांबवले. या अपघातात बस चालकाची चुक असल्याचा आरोप करत त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी बस चालकाला धारेवर धरले तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर सावंतवाडी पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर जखमीला अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले.