आम्ही आणलेल्या निधीतूनच गणेशघाटाचे सुशोभीकरण - वैभव नाईक

आम्ही आणलेल्या निधीतूनच गणेशघाटाचे सुशोभीकरण - वैभव नाईक

कुडाळ

 

         भंगसाळ नदीकिनारी सुरू असलेल्या गणेशघाट सुशोभीकरणाच्या कामाची माजी आमदार वैभव नाईक यांनी ठाकरे सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. आपण सत्तेत असताना या प्रकल्पासाठी सुमारे ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता असे सांगत दोन वर्षांनंतर का होईना हे काम आता पूर्णत्वास जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पत्रकारांशी बोलताना नाईक म्हणाले, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असताना आम्ही या कामाचा पाठपुरावा केला होता. मंदार शिरसाट उपनगराध्यक्ष असताना त्यांनी गणेश घाटाच्या नूतनीकरणासाठी ९० लाख रुपये आणले. तसेच ५ कोटी रुपये जमीन भूसंपादनासाठी आणि २ कोटी रुपये नदीच्या सुशोभीकरणासाठी असा एकूण ७ कोटी रुपयांचा निधी आम्ही मंजूर करून आणला होता." आम्ही दिलेला शब्द पूर्ण होत असून या निधीचा योग्य वापर होऊन काम पूर्ण होत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पावशी गावाच्या बाजूने आणि के. टी. बंधाऱ्याजवळ जशी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे, तशीच भिंत कुडाळच्या बाजूनेही बांधायला मंजुरी मिळाली होती. परंतु सध्याच्या नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्ष आणि दिरंगाईमुळे हे काम रखडले आहे, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रखडलेली ही सर्व कामे मंदार शिरसाट आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी सतत पाठपुरावा करून पूर्ण करून घेतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या पाहणी दौऱ्यात नगरसेवक मंदार शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, सुशील चिंदरकर, बाळा पावसकर, संदीप म्हाडेश्वर, गुरू गडकर, अमित राणे, हर्षद काळप, शैलेश काळप यांच्यासह ठाकरे सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.