कोलगाव येथे धावत्या डंपरवर झाड कोसळले.....सुदैवाने जीवितहानी नाही, वाहतूक काही काळ विस्कळीत

कोलगाव येथे धावत्या डंपरवर झाड कोसळले.....सुदैवाने जीवितहानी नाही, वाहतूक काही काळ विस्कळीत

 

सावंतवाडी

 

      येथील कोलगाव परिसरात एक मोठी दुर्घटना सुदैवाने टळली. कोलगाव येथील यामाहा शोरूमजवळून जाणाऱ्या एका धावत्या डंपरवर अचानक रस्त्याकडेचे मोठे झाड कोसळले. या थरारक घटनेत डंपरचे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, डंपर आपल्या मार्गाने जात असताना अचानक हे झाड थेट चालत्या गाडीवर आले. झाड कोसळल्याच्या मोठ्या आवाजामुळे आणि प्रसंगामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, डंपर चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि नशिबाची साथ लाभल्याने चालक पूर्णपणे सुखरूप असून, अन्य कोणालाही दुखापत झालेली नाही.या अपघातामुळे सावंतवाडी-कोलगाव मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. डंपरवरील झाड हटवून रस्ता मोकळा केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मोठी दुर्घटना टळल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.