उष्माघात व उष्माघात रुग्णांवर करावयाची उपाययोजना.

उष्माघात व उष्माघात रुग्णांवर करावयाची उपाययोजना.

सिंधुदुर्ग.

   सर्वसाधारणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे, जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे मृत्यूही होणे संभवनीय असते. विदर्भ व मराठवाडा या विभागांत उष्माघात प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळून येतो. त्यामानाने इतरत्र प्रमाण अगदीच अल्प असते. उष्माघाताने मृत्यू होऊ नये यासाठी आपण आतापासून जागरुक राहीले पाहीजे. तरी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.

अतिजोखमीचे घटक :-

1)65 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती.

2)1 वर्षाखालील व 1 ते 5 वयोगटातील मुले.

3) गरोदर माता.

4) मधुमेह व हृदयविकार तसेच अल्कोहोलीक व्यक्ती.

5) अतिउष्ण वातावरणामध्ये काम करण्याऱ्या व्यक्ती.

उष्माघात होण्याची कारणे:-

1) उन्हाळयामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे.

2) कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे.

3) जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे

4) घट्ट कपड्यांचा वापर करणे,अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.

लक्षणे-

1) थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे.

2) भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोटऱ्यात वेदना येणे अथवा पेटके येणे.

3) रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुध्दावस्था इत्यादी.

प्रतिबंधात्मक उपाय :-

1) वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे करणे टाळावे.

2) कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत.

3) उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत. सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत.

4) जलसंजीवनीचा वापर करावा, भरपूर पाणी प्यावे.

5) सरबत प्यावे.

6) अधुनमधून उन्हामध्ये काम करणे थांबवावे व सावलीत विश्रांती घ्यावी.

7) वरील लक्षणे सुरु होताच ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरु करावा.

8) उन्हात बाहेर जातांना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरण यांचा वापर करावा.

उपचार:-

1) रुग्णास वातानुकुलीत खोलीत ठेवावे अथवा हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत.

2) रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

3) रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी.

4) रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईस पॅक लावावेत.

5) आवश्यकतेनुसार सलाईन देणे.