ज्येष्ठ पत्रकार के.जी. गावडे यांना मठमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली
वेंगुर्ला (मठ) दि. १६
वेंगुर्ले तालुक्यात गेली ३३ वर्षे कुणालाही न दुखावता निष्कलंक पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार के.जी. गावडे यांच्या निधनाने मठ गावाने एक सच्चा समाजसेवक गमावला आहे, अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.मठ येथे आयोजित श्रद्धांजली सभेत बोलताना मान्यवरांनी सांगितले की, गावडे यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला-सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात आपले जिव्हाळ्याचे संबंध जपले. पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन त्यांनी गावच्या विकासासाठी मोठे योगदान दिले. 'मी आणि माझी वाडी' एवढ्यापुरते मर्यादित न राहता गावातील प्रत्येक विकासकाम सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी व्हावे यासाठी ते आमदार, पालकमंत्री आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मागे सातत्याने लागून ती कामे पूर्ण करून घेत असत. त्यामागे त्यांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता.संत लालाजी मंडळाची स्थापना करून त्यांनी दिवाळीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. सर्व पक्षीय नेते आणि पदाधिकाऱ्यांना एकत्र आणून कार्यक्रम यशस्वी करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी होती.या श्रद्धांजली सभेला राष्ट्रवादीचे एम.के. गावडे, भाजपाचे प्रसन्ना देसाई, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, अॅड. एन.पी. मठकर, शिवराम आरोलकर, सुभाष बोवलेकर, प्रदीप सावंत, मॅक्सी कार्डोज, पत्रकार अजित राऊळ, सचिन आईर, दादा गावडे, प्रकाश गावडे, दत्ता कोकरे, बबन परब, उमेश नाईक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
konkansamwad

