वेंगुर्ले येथे १८ जुलै रोजी 'नाट्यदीप - सवेष नाट्यगीत गायन' स्पर्धेचे आयोजन - सचिन वालावलकर

वेंगुर्ले येथे १८ जुलै रोजी 'नाट्यदीप - सवेष नाट्यगीत गायन' स्पर्धेचे आयोजन - सचिन वालावलकर

 

 

वेंगुर्ले

 

       माजी शिक्षणमंत्री तथा सावंतवाडी विधानसभेचे आमदार दीपक केसरकर हे कलाप्रेमी व्यक्तिमत्व आहेत. म्हणून यावर्षी दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाला संगीत नाटकाला ऊर्जितावस्था यावी या उद्देशाने 'नाट्यदीप' या शीर्षकाखाली सवेश नाट्यगीत गायन स्पर्धा वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती स्पर्धेचे संयोजक सचिन वालावलकर यांनी दिली.वेंगुर्ले शिवसेना कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, कोस्टल तालुका प्रमुख काशीनाथ नार्वेकर, उपजिल्हाप्रमुख तथा समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास कोळसुलकर, सचिन वालावलकर मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष परब आदी उपस्थित होते. माजी मंत्री तथा सावंतवाडी मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला, संस्कृतीविषयक जाणिवेला आणि कलाप्रेमाला मानाचा मुजरा करण्यासाठी त्यांच्याच नावातील "दीप" या शब्दाला आम्ही नाट्यकलेच्या दीपशिखाशी जोडले, आणि त्यातूनच या स्पर्धेचे तेजस्वी "नाट्यदीप" हे शीर्षक उदयास आले. दरम्यान १८ जुलै रोजी सायंकाळी ठिक ४ वाजता हा नाट्यगीतांचा दीप प्रज्वलीत करण्यात येणार आहे. सादरीकरण नव्हे साक्षात्कार या कॅचलाईनखाली होणारी ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी कोणत्याही भागातील गायक कलाकारांसाठी खुली आहे. वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध मधुसूदन कालेलकर सभागृहात नांदीच्या सुमधुर सुरवातीनंतर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास रोख रुपये ७०००, द्वितीय विजेत्या स्पर्धकास ५००० रुपये, तृतीय विजेत्यास ३००० रुपये, उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकास २००० रुपये व द्वितीय उत्तेजनार्थ क्रमांकास १००० रुपये व पाचही विजेत्यांना आकर्षक स्मृतिचिन्ह व सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच प्रेक्षक पसंती, सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट अभिनय, सर्वोत्कृष्ट गायन व सर्वोत्कृष्ट रंगमंचीय हालचाली यासाठी विशेष प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येणार आहेत. शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग व समर्पण फाउंडेशन सिंधुदुर्ग यांनी या स्पर्धेचे संयोजन केले आहे. सचिन वालावलकर मित्रमंडळ आणि शिवसेना वेंगुर्ला यांनी ही स्पर्धा प्रायोजित केली आहे. वेंगुर्ल्याच्या आजवरच्या इतिहासात अशी स्पर्धा कधीच झाली नाही.स्पर्धेत जास्तीतजास्त २० स्पर्धकांना सहभाग देण्यात येणार आहे. सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अधिक महिती व नावनोंदणीसाठी स्पर्धा संयोजक महेंद्र मातोंडकर ९१५८८८१६१८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, सचिन वालावलकर मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष परब, समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास कोळसुलकर व शाश्वत सेवा संस्थेच्या अध्यक्ष मिताली मातोंडकर यांनी केले आहे.