गुरुतत्त्वाचा गौरव; ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी यांचा इनरव्हील क्लबकडून सन्मान
वेंगुर्ला
भारतीय संस्कृतीतील गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करत इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित सोहळा उत्साहपूर्ण आणि संस्कारमय वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी मराठी साहित्यविश्वात वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाने स्वतंत्र ठसा उमटविलेल्या ज्येष्ठ साहित्यिक सौ. वृंदा कांबळी यांचा शाल, मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव करण्यात आला. साहित्य हे केवळ शब्दांची मांडणी नसून समाजमन घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे, याची प्रचिती सौ. वृंदा कांबळी यांच्या लेखणीतून येते. मानवी मूल्ये, सामाजिक जाणीवा, संस्कारांचा वारसा आणि स्त्रीजीवनातील विविध भावविश्व त्यांच्या साहित्यातून प्रभावीपणे मांडले गेले आहे. साहित्य, शिक्षण आणि समाजप्रबोधन या त्रिसूत्रीचा त्यांनी घेतलेला ध्यास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबच्या अध्यक्षा ज्योती देसाई होत्या. यावेळी सेक्रेटरी श्रीया परब, ट्रेझरर वृंदा गवंढळकर, आय.एस.ओ. गौरी मराठे, उपाध्यक्षा सई चव्हाण, सदस्य डॉ. पूजा कर्पे, वैभवी दाभोलकर आणि नगरसेवक गौरी माइणकर उपस्थित होते. मान्यवरांनी गुरुपौर्णिमेच्या महत्त्वावर प्रकाश टाकत गुरु हे व्यक्तिमत्त्व विकासाचे शिल्पकार असल्याचे सांगितले. सौ. वृंदा कांबळी यांच्या कार्यामुळे समाजात संवेदनशीलता आणि संस्कारक्षमतेला चालना मिळत असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. कृतज्ञतेची भावना, ज्ञानपरंपरेचा गौरव आणि साहित्यसेवेचा सन्मान यांचा संगम असलेला हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहील असा विश्वास व्यक्त करत गुरुचरणी कृतज्ञता आणि ज्ञानसंस्कारांची परंपरा समृद्ध करण्याच्या संकल्पाने कार्यक्रमाची सांगता झाली.
konkansamwad 
