इन्सुलीत शेततळ्यात आढळली मगरीची १३ पिल्ले

इन्सुलीत शेततळ्यात आढळली मगरीची १३ पिल्ले

 

सावंतवाडी

 

     सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली क्षेत्रफळ येथील रहिवासी चंद्रकांत बांदेकर यांच्या शेततळ्यात मगरीची तब्बल १३ लहान पिल्ले आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, सावंतवाडी वन विभागाने तातडीने धाव घेत या सर्व १३ पिल्लांना अत्यंत शिताफीने व सुखरूपपणे रेस्क्यू केले. वैद्यकीय तपासणीनंतर या सर्व पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले असून वन विभागाच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, इन्सुली क्षेत्रफळ येथील शेतकरी चंद्रकांत बांदेकर यांच्या शेतात असलेल्या शेततळ्यात काहीतरी हालचाल होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, तिथे मगरीची लहान पिल्ले तरंगताना दिसली. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने मगरीची पिल्ले आढळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. बांदेकर यांनी ही परिस्थिती पाहून तातडीने घटनेची माहिती.सावंतवाडी वन विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाची यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे आणि सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक व जलद प्रतिसाद पथक म्हणजेच आरआरटी टीम घटनास्थळी दाखल झाले. या मोहिमेत वनपाल विजय दाते, वनरक्षक अतुल पाटील, फिरते पथक वनरक्षक रवींद्र पाटील आणि वनमजूर चंद्रकांत पडते यांनी सहभाग घेतला. तसेच सावंतवाडी आर. आर. टी. टीमचे पथक प्रमुख बबन रेडकर, शुभम कळसुलकर, शुभम फाटक, देवेंद्र परब, पुंडलिक राऊळ आणि बाळकृष्ण गावडे यांनी जीवाची बाजी लावत अत्यंत काळजीपूर्वक शेततळ्यातून एकामागून एक अशा एकूण १३ मगरीच्या पिल्लांना बाहेर काढले. पिल्ले अत्यंत लहान असल्याने त्यांना कोणतीही दुखापत होणारनाही, याची विशेष खबरदारी रेस्क्यू टीमने घेतली. सुरक्षित बाहेर काढल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्यांना सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वन विभागाच्या या कामगिरीबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली परिसर हा मगरींच्या वास्तव्यासाठी ओळखला जातो. याच इन्सुली क्षेत्रफळ भागात अवघ्या काही दिवसांपूर्वीच, म्हणजेच १६-१७ जून ला संतोष नेवगी यांच्या विहिरीत एक ७ ते ८ फूट लांबीची महाकाय मादी मगर आणि तिच्यासोबत तब्बल १५ पिल्ले आढळून आली होती. त्यावेळीही वन विभागाच्या याच आर. आर. टी. टीमने अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये विहिरीतून त्या १६ मगरींना सुखरूप बाहेर काढले होते. या भागात लागोपाठ दुसऱ्यांदा मगरींची पिल्ले सापडल्याने वन विभाग आता या परिसरातील पाण्याच्या स्रोतांवर विशेष लक्ष ठेवून आहे.